एलसीबीने 24 तासात आरोपींना केले जेरबंद

0

नगाव येथील दरोडा प्रकरण
शिरपूर: धुळे तालुक्यातील नगाव शिवारात कापडणे येथील दिनकर रघुनाथ पाटील यांच्या मालकीच्या ‘पाटील ट्रान्समिशन वर्ल्ड’ कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात 7/8 दरोडेखोरांनी वॉचमन व आजूबाजूच्या हॉटेलवरील कामगारांना मारहाण केली. त्यांना बांधुन एका खोलीत बंद केले. चार चाकी वाहनातून गोडावुनमधून 1 लाख 82 हजार 400 किमतीची अ‍ॅल्युमिनियमची तार चोरून नेल्याची घटना शनिवारी, 13 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शेनपडु पाटील (रा.नगाव, ता.जि.धुळे) यांच्या फिर्यादीवरुन देवपुर पश्चिम पोस्टे येथे गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, अवघ्या 24 तासात एलसीबीच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे.

पावणे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

सविस्तर असे, याप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखा समांतर गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली माल वाहतूक बोलेरो पिकअप (क्र.एमएच 01-एपी 2104) वाहनाचे सकाळी वजन करण्यात आले. वाहनासोबत धुळे येथील अजमेरा नगरमधील रिझवान शेख रहिम होता. त्याचा लळिंग येथुन पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपुस करताच त्याने त्याच्या इतर 7/8 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आरोपी इम्रान खान नुरखान पठाण (रा.मोलविगंज, धुळे) यास ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून नगाव येथून चोरीस गेलेला 2 लाख 60 हजार 680 किमतीची अ‍ॅल्युमिनियम तार तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची पिकअप असा 4 लाख 60 हजार 680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी रिझवान शेख रहिम (रा.अजमेरा नगर, धुळे), इनाणखान नुरखान पठाण (रा.मोलविगंज, धुळे) यांना मुद्देमालासह देवपूर, पश्चिम पोस्टे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे धुळे येथील पो.नि.शिवाजी बुधवंत, सपोनि नथ्थु भामरे, पो.ना. कुणाल पानपाटील, उमेश पवार, पो.काँ. रवि किरण राठोड, विशाल पाटील, पो.हे.काँ. संजय पाटील, पो.काँ. केतन पाटील यांनी केली.

Copy