एलआयसी कर्मचार्‍याचे बंद घर फोडले : तुकाराम नगरातील घटना

Burglary again in Bhusawal : 64,000 was looted after breaking into a locked house in Tukaram Nagar भुसावळ : शहरात जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच नव्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरीक धास्तावले आहेत. शहरातील तुकाराम नगरात घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 64 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
तक्रारदार विरेंद्र मुरारी चौधरी (38, रा.तुकाराम नगर, भुसावळ) हे एलआयसी नोकरीला असून त्यांच्या सासर्‍यांचे निधन झाल्याने ते रविवारी डोंबिवली येथे गेल्याने बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरले. रविवारी दुपारी 1 ते सोमवार, 26 रोजी सकाळी 11 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातून 36 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅमच्या तीन अंगठ्या, 21 हजार 600 रुपये किंमतीचे कानातील तीन तोळ्यांचे, सहाशे रुपये किंमतीची चांदीची अंगठी, पाच हजार 400 रुपये किंमतीचा लहान मुलाचा चांदीचा कंबरपट्टा, सहाशे रुपये किंमतीचे चांदीचे स्त्री यंत्र असा एकूण 64 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
या प्रकरणी चौधरी यांच्या तक्रारीनंतर सोमवारी दुपारी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.