एरंडोल शहरात अस्वच्छता नगरपालिकेचे दुर्लक्ष

0

एरंडोल । शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले असून मोठ्या गटारी व नाले तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून देखील पालिकेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवुन तुंबलेल्या गटारी स्वच्छ कराव्यात तसेच प्रमुख रस्त्यावर जमा झालेला केर कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील अमळनेर दरवाजा परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावरच प्रातर्विधी करावा लागत आहे.

नाल्यात केरकचरा असल्याने आरोग्याला धोका
या परिसरात असलेल्या नाल्यात केरकचरा व घाण जमा झालेली असल्यामुळे सांडपाणी वाहण्यास अनेक अडचणी येतात.नाले व गटारी तुंबल्यामुळे डासांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले असून याठिकाणी डुकरे मोकाट कुत्रे व जनावरे यांचा मुक्तसंचार वाढला असून जनावरे कचर्‍याचा ढीग रस्त्यावर पसरल्याने असल्यामुळे पायी चालणार्‍या नागरिकांना विषेतः महिला व बालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, महात्मा फुले पुतळा परिसरात जमा होत असलेला केरकचरा नियमितपणे स्वच्छता ठेवण्याची मागणी केली आहे.

मोकाट भटक्या कुत्र्यांचा हैदोस
शहरात गटागटाने फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांमुळे नागीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन पालिकेने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.शहरासह नवीन वसाहतींमध्ये पंधरा ते विस मोकाट कुत्र्यांचा गट ठिकठिकाणी एकत्रित राहत असुन यापरिसरातुन जाणार्‍या दुचाकी वाहन चालकांच्या मागे मोकाट कुत्रे लागत असल्यामूळे अनेक वाहन चालक वाहन घसरून खाली पडत आहेत.तसेच पायी चालणार्‍या नागरिकांच्या अंगावर देखील कुत्रे धावून येत असल्यामुळे महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत पालिकेच्या स्वच्छता विभागाने त्वरित लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी नागरिकांनी केली आहे.