एरंडोल विधानसभा मतदारसंघात तूरखरेदी केंद्राची मागणी

0

एरंडोल । एरंडोल विधानसभा मतदार शासकीय तूर खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. सतिष पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी आमदार डॉ. सतिष पाटील यांचेसह उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसीलदार सुनिता जर्‍हाड यांना तुरीची गोणी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, जिल्हा सरचिटणीस आर.डी. पाटील, जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे, विश्वास पाटील, डॉ.सुभाष देशमुख, डॉ.के.ए.बोहरी, अमित पाटील, संदीप वाघ, नगरसेवक असलम पिंजारी, शेख सांडू शेख मोहम्मद यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

एरंडोल विधानसभा मतदार संघात यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र मतदारसंघात कोठेही शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कासोदा येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी बारदानाअभावी तूर खरेदी करण्यात आली नाही. तसेच मतदार संघात कोठेही तूर खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे शेतक-यांना नाईलाजास्तव कमी दरात व्यापार्‍यांना तुरीची विक्री करावी लागत आहे.सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाने दिलासा देण्याची गरज असतांना देखील याकडे हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.याबाबत त्वरित दखल घेऊन मतदारसंघात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करून शेतकर्‍यांसमोर उभे राहिलेले संकट दूर करावे, अशी मागणी आमदार डॉ. सतिष पाटील यांनी निवेदनात केली आहे.

शासनाच्या दुर्लक्षानेच संकट
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, तहसिलदार सुनीता जर्‍हाड यांना तुरीची गोणी भेट देऊन शेतकर्‍यांच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याची मागणी करण्यात आली. भेट दिलेली तूर निवडून व स्वच्छ करू देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबाबत आमदार डॉ.पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांकडे माल आहे मात्र ते विकू शकत नाही.शासनाने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी मिळेल त्या किमतीत व्यापार्‍यांना तुरीची नाईलाजास्तव विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.