एरंडोल येथे मुलीने दिला वडिलांना अग्निडाग

0

एरंडोल । येथील मुलीने आपल्या वडिलांच्या चितेला अग्निडाग देवून गौरवास्पद कार्य केले. मुलीच्या या कार्याचे शहरासह परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. या अगोदर एरंडोल शहरातील रेखा शिरसाठ यांनी आपल्या सासर्‍यांना अग्निडाग दिला होता. एरंडोल येथील अष्टविनायक नगरमध्ये राहणार्‍या रजनी सुरेश बडगुजर यांचे वडील सांडू सदाशिव बडगुजर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. सांडू बडगुजर यांना दोन मुले व पाच मुली आहेत. सांडू बडगुजर यांची लहान मुलगी रजनी बडगुजर यांनी वृध्दापकाळात आपल्या वडिलांचा सांभाळ केला. त्या गृहिणी असून घरीच खाजगी शिकवण्या घेतात. त्यांचे पती सुरेश बडगुजर हे ते न्यायालयात शिपाई आहेत. स्वतः सांडू बडगुजर हे सहकार कार्यालयात नोकरीला होते. यावेळी रजनी यांच्या भावांनीही मोठ्या मनाने आपल्या बहिणीच्या मनातील इच्छा व वडिलांप्रती असलेलं प्रेम ओळखुन बहिणीस अग्निडाग देण्यास सांगितले. रजनी बडगुजर यांनी वडिलांच्या स्वर्ग प्रवासातला अग्निडाग स्वतः देऊन नवीन पिढीला मुले किंवा मुली असा भेदभाव करणार्‍यांपुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे व बडगुजर समाजातील हे पहिलेच उदाहरण असल्याचे यावेळी समाजातील लोकांनी सांगितले.