एरंडोल बसस्थानक प्रवेशद्वाराजवळ जीवघेणा खड्डा पडल्याने प्रवाशी त्रस्त

0

एरंडोल । खाजगी वाहनाने प्रवास करणे धोक्याचे असल्याने बहुतांश लोक आजही शासकीय वाहन असलेल्या बसला प्राधान्य देतात. खाजगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक होत असल्याने अनेक जण महामंडळाच्या शासकीय गाड्याने प्रवास करतात. परिवहन महामंडळाच्या गाड्याने प्रवास सुकर होतो अशी धारण आजही आहे. मात्र महामंडळाच्या गाड्यानेही आता प्रवास सुखकर होईल याची शाश्‍वती नाही. दिवसेंदिवस रस्त्याची अवस्था गंभीर होत चालली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती एंरडोल येथील नविन बसस्थानकात दिसून येते. बसस्थनकाची अवस्था गंभीर असून बसस्थानकात प्रवेश करताच प्रवाशांना खड्डाचे दर्शन होते. प्रवेशद्वारा जवळच मोठा खड्डा पडल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांनाच नव्हे तर महामंडळाच्या वाहन चालकास देखील वाहनाची ने-आण करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी वाहनांची व प्रवाशींची वर्दळ मोठी असते. खड्डांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

बसस्थानकात सुविधांचा अभाव : बस स्थानकाच्या परिसरात सर्वत्र काटेरी झुडपे वाढली असुन या ठिकाणी मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा मोठा वावर असतो. सर्वत्र दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकात लावण्यात आलेले पंखे कायम बंद असते. रात्री लाईट बंद राहत असल्यामुळे अंधार राहत असतो त्यामुळे अवैध धंद्यांना उत आला आहे. काटेरी झुडपे वाढल्यामुळे या ठिकाणी नागरिकांकडून लघुशंका व प्रात:विधी केली जात असल्याने दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विभाग नियंत्रक, आगर प्रमुख, स्थानक प्रमुख यांनी त्वरित लक्ष घालून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर पडलेला खड्डा बुजवावावे व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

सहा महिन्यांपासून तीच परिस्थिती
एरंडोल येथील नवीन बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळचा खड्डा सहा महिन्यापूर्वीपासून पडला आहे. स्थानकामध्ये येणार्‍या व जाणार्‍या बस मधील प्रवाशांना खड्ड्यामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. वेगाने एसटी बस घेऊन येणार्‍या बस चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसतो. वाहन चालकास मोठी कसरत करुन वाहन न्यावे लागते. खड्डामुळे वाहन चालकाचा अंदाज चुकल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. प्रवाशांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. बस स्थानकाचे आगार प्रमुखांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात
देशात अस्वच्छता नष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शासनाच्या अजेंड्यावरील स्वच्छता हा महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी शासकीय अधिकारी तसेच पदाधिकार्‍यांनी स्वत हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. परिवहन महामंडळ देखील शासकीय विभाग आहे. मात्र एरंडोल बसस्थानक अस्वच्छेतच्या विळख्यात सापडले आहे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र घाण पसरली असुन बस चालकास बस कोठे लावावी असा प्रश्न पडतो आहे.