Private Advt

एरंडोलजवळ ट्रकने दुचाकीला उडवले : नागपूर जिल्ह्यातील बांगडी विक्रेता जागीच ठार

तिघे जखमी : अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी केली अटक

एरंडोल/भुसावळ : एरंडोल-धरणगाव रस्त्यावरील श्री मोटर्सजवळ एरंडोलकडून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला. अपघातप्रकरणी एरंडोल पोलिसात ट्रक चालकाविरोधात मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. भोला अर्जुन सिसोदीया (राजपूत) (30, मांढवी, ता.जि.नागपूर, ह.मु.कोळगाव, ता.भडगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

भरधाव ट्रकने उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
एरंडोलकडून धरणगावकडे भरधाव जाणार्‍या ट्रकने (क्रमांक आर.जे.11 जी.ए.9335) धरणगावकडून येत असलेल्या दुचाकी (एम.पी.12 एच.डब्ल्यू 8829) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील चारही जण फेकले जावून गंभीर जखमी झाले तर भोला अर्जुन सिसोदीया (30, रामगढी, ताजिया, नागपूर) या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला त्याचे साथीदार अजयकुमार चव्हाण (वय 20), लोकेश सोळंकी (30), राम जीवन चव्हाण (42) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. डॉ.कैलास पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. नंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

आई-वडीलांची भेट ठरली अखेरची
अपघातात मयत झालेला भोला सिसोदीया हा युवक मुळचा नागपूर जिल्ह्यातील असून बांगड्या विक्री करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. 19 रोजी तो आई-वडीलांना भेटण्यासाठी दुचाकीने नागपूरला गेला होता तर परतीच्या प्रवासात कोळगावकडे निघाल्यानंतर गुरुवार, 25 रोजी त्याच्यावर कु्रर काळाने घाला घातला. दरम्यान, अपघातप्रकरणी मयताची पत्नी दिया भोला सिसोदीया (मांडवी, ता.जि.नागपूर, ह.मु.कोळगाव, ता.भडगाव) यांनी एरंडोल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक जप्त केला असून चालकाला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.