Private Advt

एरंडोलच्या तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू

एरंडोल : अवघ्या पाच दिवसांवर लग्न आले असताना शहरातील उपवर असलेल्या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भावेश संजय महाजन (25, महात्मा फुले नगर, एरंडोल) असे मयताचे नाव आहे.

विहिरीत आढळला मृतदेह
शहरातील महात्मा फुले पुतळा परीसरातील नागोबा मढी भागातील रहिवासी भावेश संजय महाजन (25) हा तरुण बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास आपले काका ज्ञानेश्वर महाजन यांची दुचाकी घेवून नाष्टा करण्यासाठी बाहेर पडला मात्र बराच वेळ होवूनही भावेश न परतल्याने ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी तपास केला मात्र भावेश घरी परतला नव्हता तर थोड्या वेळाने त्यांचे पुतणे राकेश व मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांना मोबाईलवर आपल्या शेताजवळील सुनीनल भैया पाटील यांच्या शेतातील विहिरीत भावेश विहिरीत पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी ज्ञानेश्वर महाजन व त्यांचे नातेवाईक गजानन माळी दाखल झाले. भावेशला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
मयत भावेशचे सोमवार, 25 रोजी एरंडोल शहरात कोमल महाजन या तरुणीशी विवाह होणार होता व रविवार, 24 रोजी हळदीचा समारंभही असल्याने वधू-वरांच्या घरी आनंदाचे वातावरण होते मात्र बुधवारी अचानक भावेशचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्यानंतर शोककळा पसरली तर एरंडोल शहरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत भावेशच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. ज्ञानेश्वर महाजन यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.