एम.बी. कॅम्पमध्ये स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबना

0

देहूरोड : एम. बी. परिसरात स्वच्छतागृहांअभावी नागरिकांना मोकळ्या जागेत शौचासाठी जावे लागते. मात्र, काही दिवसांपासून या जागेतही बिल्डरने प्रखर प्रकाशझोताचे दिवे लावल्यामुळे प्रश्‍न अधिक बिकट बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी या भागात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे नुकतेच या भागाची पालिकेच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली.

गृहनिर्माण विभागाकडून झोपडपट्टीच्या विकासाचे आदेश
एम. बी. कॅम्प झोपडपट्टीतील नागरिकांच्या नरक यातना दिवसेंदिवस अधिक वाढतच चालल्या आहेत. स्वातंत्र्यपुर्व काळापासून वसलेल्या या झोपडपट्टीची जागा खासगी मालकीची असून पालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही या जागेचा प्रश्‍न कायम आहे. सुमारे 29 हजार 729 चौरस मीटर परिसरावर वसलेल्या या झोपडपट्टीत आजमितीला जवळपास 632 झोपड्या आहेत. नोव्हेंबर 2010 मध्ये राज्याच्या गृहनिर्माण विभागाने या भागाला झोपडपट्टी घोषीत करुन पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, येथील नागरीक आजही नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जागेच्या तिढ्यामुळे या भागात आजवर एकही सार्वजनिक किंवा खासगी स्वच्छतागृह उभारण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते. मात्र, काही दिवसांपासून ही मोकळी जागा जागामालकाने एका बिल्डरला भाडे तत्वावर दिली आहे. बिल्डरने हा परिसर स्वच्छ करून या ठिकाणी प्रखर प्रकाश झोताचे दिवे लावले आहेत. या प्रकारामुळे उघड्यावर शौचास जाणार्‍या नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. विशेषतः महिला व तरुणींची कुचंबना होत आहे.

अन्यथा टरमाळे आंदोलन करणार
पालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन-पुनर्वसन विभागाचे अधिकारी तथा सहआयुक्त योगेश कडुसकर, अभियंता राजेंद्र इंगळे, एस. बी. पाटील, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. एस. शिंदे स्थापत्य विभागाचे अभियंता हरविंदर बन्सल, सुभाष काळे, संजय बंडगर आदींनी या ठिकाणी भेट देऊन परिसराची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल तत्काळ संबंधित विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असून तो तत्काळ न सोडविल्यास पालिकेच्यासमोर प्रवेशद्वार बंद करून किंवा टरमाळे घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तंतरपाळे यांनी दिला आहे. यावेळी या प्रभागाचे माजी नगरसेवक मनोज खानोलकर हेही उपस्थित होते.

नगरसेवक गेले कुठे?
एम. बी. कॅम्प झोपडपट्टीतील साडेसहाशे कुटुंबांचा स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर असून या प्रश्‍नाबाबत विद्यामान नगरसेवक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी आवाज उठविल्यामुळे अधिकार्‍यांनी तत्काळ दखल घेत या भागाची पाहणी केली. मात्र, यावेळी विद्यमान नगरसेवकांपैकी एकही याठिकाणी उपस्थित नव्हते. विद्यामान नगरसेवकांना हा प्रश्‍न महत्त्वाचा वाटला नाही की, अधिकारी आणि नागरिकांशी त्यांचा समन्वय नाही? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.