एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

पुणे : भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या उरुळी कांचन येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. अनिकेत संजय धुमाळ (22, रा. उरुळी कांचन) असे त्याचे नाव आहे. एमबीबीएसच्या अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी संजय धुमाळ यांनी तक्रार केली आहे.

डॉ. अर्चना धुमाळ यांचे खासगी रुग्णालय आहे. त्यांना अनिकेत व सुयश अशी दोन मुले आहेत. अनिकेत हा भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वडिलांनी अनिकेतला अभ्यासासाठी उठवले. त्यानंतर पहाटे पाच वाजता अनिकेत अभ्यास करतो का हे पाहण्यासाठी वडिलांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र खोलीतून कसलाही प्रतिसाद न आल्याने त्यांनी जोराने धक्का देऊन दरवाजा उघडला असता, अनिकेतचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेला आढळून आला.