एमएसईबीच्या लाईनमनला ट्रॅक्टरची धडक

0

शिरपूर:अवैध वीटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दहिवद 132 केव्ही सबस्टेशनहुन ड्युटी करून येणाऱ्या लाईनमनला दहिवद गावाजवळ समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी, 14 रोजी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात लाईनमन प्रकाश बोरसे यांच्या एका हाताला फ्रॅकचर आणि डोक्याला मार बसला आहे. परिसरातील नागरिकांनी त्या ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही हुलकावणी देऊन ट्रॅक्टर पसार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

तालुक्यातील दहिवद सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेले प्रकाश बोरसे आपली ड्युटी संपवून शिरपूरकडे येत होते. तेव्हा समोरून भरधाव ट्रॅक्टर (मालक गणेश पाटील, रा.करवंद नाका ट्रॅक्टर क्र.MH -18 Z- 3182) येत होते. ते पाहून बोरसे यांनी आपल्या दुचाकीचा वेग हळू केला. परंतु ट्रॅक्टरने बोरसे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांना जोरात मार बसला आहे.

दरम्यान, लौकी गावातील गणेश पाटील यांची वीटभट्टी पूर्णपणे अवैधरित्या सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा परवाना नसतांना मुजोरी करून परिसरात वीटभट्टी सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.