एमआयएमने डावाचे पत्ते बदलले

0

लातुर । ऑेल इंडिया मजलिस-इ-इतेहादूल मुस्लीमन (एमआयएम)या नावावरून मुस्लिमांचा पक्ष म्हणून चित्र दिसते.पुढील महिन्यात लातूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसांठी एमआयएम पक्षाने मुस्लीम, दलित, इतर मागासवर्गीयांच्या ऐक्याचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. दोनच दिवसांपूर्वी लातूर शहरात झालेल्या खासदार असेउद्दिन ओवेसी यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर बदलाचे वारे वाहणार, असेच संकेत दिले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम व शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील टाऊन हॉलच्या मदानावर या आठवडयात झालेल्या सभेस लातूरकरांची मोठी गर्दी झाली होती. एक पैसा ही खर्च न करता नागरिकांनी पहिल्याच सभेला मोठा प्रतिसाद दिला. नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमने लातूर जिल्हयातील उदगीर येथे, शेजारच्या बीड शहरात व महापालिका निवडणुकीत सोलापुरात आपले अस्तित्व दाखविले आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे.

काँग्रेसने सोयीनुसार वापर केला
लातूर महापालिकेत व पूर्वीच्या नगरपालिकेत अनेक वर्ष एकहाती काँग्रेसचीच सत्ता राहिली. मुस्लीम व दलित मताचा काँग्रेसने आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला मात्र त्यांच्या विकासासाठी नेमके पाऊल उचलले नसल्याचा आरोप केला.दलित व मुस्लीम एकत्र आले व त्याला ओबीसीची साथ मिळाली तर मोठा चमत्कार घडू शकतो. उदगीर शहरात पहिल्यांदाच एमआयएमचे सहा नगरसेवक तर बीडमध्ये नऊ नगरसेवक निवडून आले. योग्य नियोजन केले तर महापौर कोणाचा होणार? हे ठरवण्याइतक्या जागा परिवर्तन आघाडीला मिळू शकतात हे हेरून ओवेसी यांची सभा झाली.

शहरातील सहा प्रभागांत मुस्लीम व दलित यांचे प्राबल्य आहे. 70 पकी तब्बल 24 नगरसेवकांचे भवितव्य दलित, मुस्लीम मतांवर अवलंबून राहणार आहे.उदगीर शहरात पहिल्यांदाच एमआयएमचे सहा नगरसेवक तर बीडमध्ये नऊ नगरसेवक निवडून आले.लातूरमध्ये मुस्लीम, दलित, ओबीसी अशी एकी करून निवडणूक लढविण्यात येणार आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. – इम्तियाज जलील, आमदार

मुस्लिमांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक
मुस्लीम समाजाची लातूरमध्ये का उपेक्षा केली जाते आहे, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी येथील सत्ताधार्‍यांनी का प्रयत्न केले नाहीत, असे सवाल उपस्थित करून मुस्लीम समाजाच्या भावनेला ओवेसी यांनी हात घातला. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात जातीयवादी भूमिका काँग्रेसने कशी घेतली याची उदाहरणेही त्यांनी दिली. लातूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे पावणेतीन लाख मतदारसंख्या राहील. त्यात दलित, मुस्लिमांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक आहे.

आगामी काळात आघाडी
एमआयएम विविध समविचारी पक्षांना सोबत घेऊन आपला आवाका वाढवत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे प्रचारसभेतून जाहीर केले.आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही आघाडी केली जाणार आहे. लातूर महापालिका निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्यावतीने लढवल्या जाणार्‍या या निवडणुकीत एमआयएम सक्षम पर्याय उभे करण्याच्या विचारात आहे. मुस्लीम, दलित, ओबीसी एकत्र आले तर परिवर्तन होऊ शकते असा विश्वास महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील व एमआयएमच्या ओवेसी यांना वाटतो आहे.