Private Advt

एटीएम कार्डची अदलाबदली करीत शेतकर्‍याला 40 हजारांचा गंडा

भडगाव : शहरातील बसस्थानक परिसरात एटीएम कार्डची अदलाबदली करून अज्ञात तीन जणांनी शिरसमणीच्या शेतकर्‍याच्या खात्यातून परस्पर 40 हजार रूपये काढून घेतले. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला.

शेतकर्‍याला घातला गंडा
भगवान गिरधर पाटील (60, शिरसमणी, ता.पारोळा) शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. 5 एप्रिल रोजी कामाच्या निमित्ताने ते भडगाव शहरात आले होते. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकासमोरील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात तिघे एटीएम जवळ आले. त्यांनी शेतकर्‍याचे कार्ड गोडबोलून अदलाबदली करून घेतले. त्यावेळी त्यांनी कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्ड व पासवर्ड वापरून खात्यातील 40 हजारांची रोकड परस्पर काढली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय जाधव करीत आहे.