एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणार्‍यांची दिशाभूल करीत रक्कम लाटणार्‍या आंध्रातील दोघांना बेड्या

शहादा : एटीएममध्ये रोकड काढण्यासाठी येणार्‍या खातेदारांच्या अजाणतेपणाचा फायदा घेत त्यांना मोहिनी घालून एटीएम कार्ड हात चलाखीने बदलून लाखोंचा गंडा घालणार्‍या आंध्रप्रदेशातील दोघांना शहादा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींसह त्यांच्या टोळीतील सदस्यांनी देशभरात अशा पद्धत्तीने तब्बल 54 खातेदारांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णमूर्ती रेड अप्पा सुनाप शेट्टी (40, रा.कोंकारीगस, पो.बेळ सुंदर, ता.कादरी. जि.अनंतपूरम) व मोहन वेंकटरमणा चिधला (28, रा.राजुनगर, ता.पिलेर) अशी या आरोपींची नावे असून दोघे आंध्र प्रदेश राज्यातील आहेत.

शहादा पोलिसात दाखल होता गुन्हा
शहादा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम केंद्रात खात्यातील रक्कम काढण्यासाठी आलेल्या खातेदारास एटीएम मशीन जवळ संभ्रमात ठेवून मदतीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यातून रोख 83 हजार काढून लंपास केले होते. ही घटना 30 मे 2022 रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्यात तपासात आरोपी जुनागडला असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना मिळाली होती. या आधारे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व सहकार्‍यांनी गुजरात राज्यातील जुनागड येथून वरील दोघा आरोपींना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.