एक लाखांचे टायर्स लांबवले : दोघे आरोपी जाळ्यात

गावर कंन्ट्रक्शन कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी लांबवले होते महागडे टायर्स ः गुन्हे शाखेने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

भुसावळ : एक लाख रुपये किंमतीचे पाच टायर्स लांबवणार्‍या भामट्यांना जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींच्या ताब्यातून चोरी झालेले टायर्स जप्त करण्यात आले. सुनील शिरसागर इंगळे (रा.नवा नगर, खामगाव नाका, बाळापूर, जि.अकोला ह.मु.कपिल वस्ती, वरणगाव) व शाहरुख बिसा कुरेशी (रा.फेकरी, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना अधिक कारवाईसाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून चोरीचे टायर्स खरेदी करणार्‍यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

तालुका पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा
निंभोरा शिवारात भारत पेट्रोल पंपाजवळ गावर कंन्ट्रक्शन कंपनी, हरीयाणाचा डेपो आहे व डेपोतील वाहने भुसावळ-चिखली महामार्गाच्या कामासाठी साहित्य वाहून नेतात. विविध वाहनांसाठी लागणार्‍या सामानाची जवाबदारी सुपर वायझर अवधेश कुमार रामभरोस (सुंदरीपुर, लोहियापूर, ओरीसा उत्तरप्रदेश) यांच्याकडे देण्यात आली आहे. डेपोतून 21 ते 22 जून दरम्यान चोरट्यांनी 93 हजार 750 रुपये किंमतीचे टायर्स लांबवल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, एएसआय शरीफ काझी, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल रणजीत जाधव, चालक मुरलीधर बारी आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.