एक था ‘डी.एड’!

0

डॉ.युवराज परदेशी:
एकेकाळी त्वरित नोकरी मिळवून देणारा म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेल्या डी. एड अभ्यासक्रमाला गेल्या काही वषार्र्ंपासून घरघर लागली आहे. पाच ते सात वषार्र्ंपूर्वी बारावी कला, वाणिज्य, विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा अध्यापक शिक्षण पदविका अर्थात डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अल्प काळात उत्तम वेतनाची नोकरी हमखास मिळत असल्याने अनेक वर्ष या अभ्यासक्रमाकडे शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डी.एड अभ्यासक्रमाला उतरती कळा लागली आहे. त्यास अनेक कारणे आहेत, सन 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी डी.एड उत्तीर्ण व्हावे लागेल, इतके पुरेसे राहिले नाही. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नव्याने अभियोग्यता चाचणी परीक्षा या दोन्ही परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर शिक्षकाची नोकरी लागेल, या विषयी शाश्वती नाही. त्यामुळे डी.एड प्रवेशाकडे विद्यार्थी पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. राज्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त त्यातच डी.एड, बी.एड होऊन नोकर्‍या नसणारे ढिगाने असल्याने पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कॉलेज बंद पडले आहेत. आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी देशभरात केवळ बीएड हा एकच अभ्यासक्रम उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे डी.एड महाविद्यालयांचे अस्तित्वही इतिहासजमा होणार आहे.

बी.एड, डी.एड कॉलेजला काही वर्षांपूर्वी सुगीचे दिवस होते. शासकीय महाविद्यालयांपेक्षा खासगी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली. या महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने वाढू लागली. या विद्यार्थ्यांना खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी करण्याची संधी देखील मिळत होती, परंतु शिक्षक भरतीसाठी शासनाने टीईटी सुरू केली आणि या महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यातही बी.एड, डी.टी.एडधारकांसाठी सीईटी 2008 नंतर झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारांचा आकडा दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी अध्यापक पदविका, पदवीचे शिक्षण पूर्ण घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सरासरी एक लाखापयर्र्ंत असते. राज्यभरात डी.टीएड, बी.एडधारक बेरोजगारांची संख्या 10 ते 12 लाखांदरम्यान आहे. शिक्षक भरतीच होत नसल्यामुळे प्रशिक्षित शिक्षकांची अवस्था बिकट झाली आहे. प्रशिक्षित शिक्षक वेटिंगवर, तर अप्रशिक्षित शिक्षकांना इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये नोकर्‍या, अशी स्थिती काही भागात दिसते. डी.एड-बी.एड अभ्यासक्रम पूर्ण करुन बेरोजगारांच्या फौजा निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास गल्लीबोळात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचा उल्लेख करावाच लागेल. सद्यस्थितीत एनसीटीईकडे सुमारे 1100 महाविद्यालयांची नोंदणी असली, तरी प्रत्यक्षात त्यातील अनेक कुलूपबंद असून, प्रत्यक्षात 350 महाविद्यालये सुरू असली, तरी तेथे पुरेशी विद्यार्थीसंख्या नाही.

राज्यात डीएलएड प्रवेशाची क्षमता एकूण 55 हजार 644 एवढी आहे. त्यातील 36 हजार 163 जागा शासकीय कोट्यातील, तर उर्वरित 19 हजार 481 प्रवेश व्यवस्थापन कोट्यातील आहेत. गतवर्षीही दहा हजारांच्या सुमारास डीटीएडचे प्रवेश झाले होते. यावरुन त्यांनी बिकट अवस्था लक्षात येते. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), सामइक प्रवेश परीक्षा (सीईटी) यांच्या फेर्‍यात अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे बी.एड, डी.एड कॉलेजचे मरण होत आहे. टीईटी, सीईटी उत्तीर्ण झालेले हजारो विद्यार्थी सात वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीच न मिळाल्यामुळे आता या अभ्यासक्रमाकडे ओढा कमी झाला हे उघड सत्य कुणीही नाकारु शकत नाही. बी.एड अभ्यासक्रमाबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बी.एड व टीईटीचा अभ्यासक्रम तयार करणार्‍यांमध्ये समन्वय असला पाहिजे, पण समन्वय दिसत नाही. बी.एडची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘टीईटी’मध्ये उत्तीर्ण होत नाहीत ही बाब गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे. दोन्ही अभ्यासक्रम तयार करणार्‍या व दोन्ही परीक्षा घेणार्‍यांमध्ये समन्वय असेल, तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. सध्या प्राथमिक शिक्षकांना डी.एड हा अभ्यासक्रम आणि त्यानंतर टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तर माध्यमिक शिक्षकांना पदवीनंतर बी.एड आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी बी.एड व पदव्युत्तर पदवी बंधनकारक आहे. मात्र, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता देशात चार वर्षीय इंटिग्रेटेड बी.एड हाच अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यातच शालेय शिक्षणातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील शिक्षकांसाठी आवश्यक असलेले अभ्यास घटक समाविष्ट केले जाणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षक पदासाठीही चार वर्षीय बी.एड अभ्यासक्रमच करावा लागेल. यामुळे डी.एडचे अस्तित्व संपेल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार, शिक्षक पदासाठी चार वर्षांचा बी.एड अभ्यासक्रमच ग्राह्य धरला जाणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षकांची भरती प्रक्रिया अर्धवट आहे. त्यातील डी.एडधारकांच्या भवितव्याचे काय होणार? हा प्रश्न आता निर्माण होईल. 2

030 पर्यंत बहुशाखीय सोय नसलेल्या, दुय्यम आणि मोडकळीस आलेल्या सर्व शिक्षण संस्थादेखील बंद होतील. एका अर्थाने यात शिक्षणाचा दर्जा उंचविण्याचा प्रयत्न होत असला तरी शिक्षकांच्या पोटावर पाय पडायला नको ही अपेक्षा आहे. कारण, हा प्रश्‍न किंवा समस्या केवळ डी.एड व बी.एड अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांपुरता मर्यादित नाही. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी व एमबीए अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून असलेली वाढीव मागणी लक्षात घेत भारंभार अभियांत्रिकी, एम.बी.ए महाविद्यालयांचे पेव फुटले होते. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या या अभ्यासक्रमांच्या दर्जाविषयी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांची संख्या वाढू लागली. गेल्या तीन ते चार वषार्र्ंपासून अभियांत्रिकी व एम.बी.ए अभ्यासक्रमांच्या तर निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहू लागल्या आहेत. बी.एड-डी.एड पाठोपाठ अभियांत्रिकी, एम.बी.ए अभ्यासक्रमांना लागलेली उतरती कळा लक्षात घेता अनेक शिक्षणसम्राटांनी आपला मोर्चा फार्मसी महाविद्यालयांकडे वळवला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात या बाजारीकरणाकडेही लक्ष देण्याची
अपेक्षा आहे.

Copy