एक था टायगर!

0

डॉ. युवराज परदेशी

देशातील वाघांच्या घटत्या संख्येबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. यासंदर्भात माहिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गेल्या वर्षी अर्थात 2019मध्ये देशात 110 वाघांचा मृत्यू झाला असून त्यात शिकार करण्यात आल्यामुळे एक तृतीयांश वाघांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात मध्यप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक म्हणजे 29 वाघांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी साजरा झालेल्या जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आनंदवार्ता दिली होती. ती म्हणजे, देशातील वाघांची संख्या वाढून ती 2967 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील वाघांची संख्या 190 वरून 312 इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे निश्चितच अभिमानास्पद आहे मात्र त्याचवेळी त्यांच्या शिकारीचेही प्रमाण वाढणे चिंतेचे कारण आहे.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून भारतीय संस्कृतीचे वाघ हे एक प्रतीक आहे. आज प्रामुख्याने जंगली वाघ भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन, रशिया येथे आढळतो. भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यांत वाघांचे प्रमाण समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोर्‍यात कोयना, चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आढळते. तर राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. शिकार व वसतीस्थानाचा नाश आणि जंगलातील नागरीकरणाचे वाढते अतिक्रमण यामुळे वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जंगली वाघातील 50 टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी देशात वाघ दुर्मीळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे व्याघ्रसंरक्षण काळाची गरज आहे. भारताच्या विविध भागात व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली असून कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. या सर्व उपयायोजनांमुळे देशातील वाघांची संख्या निश्चितपणे वाढली, यात दुमत नाही मात्र याचवेळी त्यांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. या वस्तूस्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओने 2000 ते 2018 दरम्यान जगभरात एक सर्व्हे केला. यातील माहितीनुसार, गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर 382 वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. भारतात 2012 ते 2018 या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल 656 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तब्बल 207 वाघांचा मृत्यू अवैध शिकारीमुळे झाला असून 2019 मध्ये सप्टेंबर महिन्या अखेर 41 वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती नॅशनल टाइगर कंझर्व्हेशन ऍथॉरिटी (एनटीसीए) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आली. जगातील वाघांची संख्या 3,951 असून इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक 2,967 वाघ आहेत. ही जेवढी अभिमानाची बाब आहे तितकीच जबाबदारीचीही आहे. कारण भारतातील वाघांची मृत्यूमुखी पडण्याची आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या पाहणीनुसार 2018मध्ये मध्यप्रदेशात 23, महाराष्ट्रात 19, कर्नाटक 16, उत्तराखंड 8, उत्तर प्रदेश आणि राजस्थान प्रत्येकी 6 आणि केरळमध्ये 5 वाघांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक म्हणजे 29 वाघांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 12 वाघांचा मृत्यू झाला असून राजस्थान आणि केरळमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 3 वाघांचा मृत्यू झाल्याचंही या सर्व्हेत दिसून आले आहे. उत्तर प्रदेशातही 6 वाघांचा मृत्यू झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, 2018 च्या तुलनेत बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. 2018मध्ये एकूण 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर यंदा 491 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी एकट्या महाराष्ट्रातच 97 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचंही आढळून आले आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असतांना एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असणे ही लाजीरवाणी बाब आहे. भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो. थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या 49 घटनांमध्ये 369 वाघांची शिकार करण्यात आली आहे. भारतात वाघांची संख्या वाढत असल्याने शिकारी व तस्कारांची नजर भारतावर रोखली गेली आहे. यामुळे स्थानिक शिकार्‍यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तस्तर भारतातील जंगलांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येते. वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील रथीन्द्रोनाथ दास (43) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास या दाम्पत्याने ‘जर्नी फॉर टायगर’ अभियान सुरू करुन भारतभ्रमण सुरु केले आहे. आतापर्यंत त्यांनी 21 हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास पुर्ण केला आहे. यात प्रत्येकजण हातभार लावू शकतो. शिकार्‍यांना रोखणे हे जरी आपल्या हाती नसले तरी अन्यप्रकारेही आपण वाघ, बिबट्या यांच्यासह अन्य वन्य प्राण्यांचे रक्षण करु शकतो. मुळात या वन्यप्राण्यांचे स्वत:चे विश्व असते. परंतू त्यांच्यात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांची पावले मानवी वस्त्यांकडे वळत आहेत, हे प्रत्येकाने मान्य करायलाच हवे. यासाठी ‘जंगल बचाओ’ ही घोषणा कुठेतरी योग्य ठरत आहे. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाशी खेळ सुरु केला आहे. त्याचे परिणाम किंवा दुष्यपरिणाम होतीलच! हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही. वाघ हा अन्न साखळीतील महत्त्वपूर्ण घटक आहे. आज शिकारीमुळे जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाघांवरच सैरभैर पळण्याची वेळ आली आहे, मग मानवापेक्षा वाघ हा हिस्त्र प्राणी कसा? देशातील वाघांच्या घटत्या संख्येवर केवळ चिंता न व्यक्त करता, त्याच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलली तरच ‘टायगर जिंदा है’ असे म्हणता येईल अन्यथा ‘एक था टायगर’ असे म्हणण्याची वेळ येईल!