Private Advt

एक कोटींचे ब्राऊन शुगर प्रकरण : मुख्य आरोपीसह महिलेला पुन्हा कोठडी

भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केल्याची कारवाई शनिवार, 11 डिसेंबर रोजी केली होती. या प्रकरणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला सुरूवातीला व नंतर ब्राऊन शुगरचा पुरवठा करणार्‍या मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) यालादेखील अटक करण्यात आली होती. दोघा आरोपींना सुरूवातीला 24 पर्यंत व नंतर 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

तिसर्‍यांदा सुनावली पोलिस कोठडी
सोमवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.एस.पी.डोलारे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची अर्थात 29 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी अख्तरीबानोतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल तर आरोपी सलीमतर्फे अ‍ॅड.जैनोद्दीन शेख तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.संजय डी.सोनवणे यांनी युक्तीवाद केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.