एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात; पाच ठार

0

पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुपारी तीनच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. रस्त्यावर ऑईल सांडल्याने कार घसरुन बसखाली आल्याने हा विचित्र अपघात घडला. जखमींना तत्काळ उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींची प्रकृती चिंताजनक होती. अपघातातील कार अक्षरशः चक्काचूर झाली होती. अपघातातील मयत आणि जखमी हे सर्वजण मुंबईतील विरार आणि वसईतील रहिवासी आहेत. दिवसभरात झालेल्या दोन अपघातांमुळे एक्स्प्रेस वे अर्धादिवस जवळपास ठप्पच होता.

अपघातात कार अक्षरशः चक्काचूर
प्राप्त माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार रस्त्यात ऑईल सांडल्याने व्हॉल्वो बसखाली गेली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक दीपक याचा घटनास्थळीच तर श्रद्धा पाटील (वय 19), भामिनी देशमुख (वय 60), दत्तात्रय देशमुख (वय 63), राखी पाटील (वय 40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संजना पाटील, रुपाली देशमुख, राहुल देशमुख, रुपेश देशमुख, ओम देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण मुंबईतील विरार आणि वसई येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली.

…अन्य अपघातात दोन गंभीर
रविवारी सकाळीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळच सकाळी पावणेआठच्या सुमारास ट्रक आणि क्रेनचा अपघात झाला होता. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. सकाळी झालेल्या अपघातामुळे या हायवेवर दोन किलोमीटरहून अधिक अंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्याने एक्स्प्रेस वेवर मोठी गर्दी होती. या प्रवाशांची वाहतूक कोंडीने गैरसोय झाली. काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत कऱण्यात आली असतानाच, हा दुसरा अपघात घडला. त्यामुळे रविवारी एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला.