एकोणीस लाख ग्राहकांकडून ऑनलाईन वीज बिल भरणा

0

पिंपरी-चिंचवड : महावितरणच्या वीज बिलांची रक्कम ऑनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीज ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात पिंपरी व भोसरी विभागात 18 लाख 98 हजार वीज ग्राहकांनी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून तब्बल 312 कोटी 16 लाख रुपयांचा घसबसल्या भरणा केला आहे. 2015-16 या वर्षाच्या तुलनेत 2016-17 या वर्षी ऑनलाइन बिल जमा करणार्‍यांची संख्या तब्बल पाच लाखांनी वाढली आहे.

घरबसल्या बिल भरण्याची सुविधा
ऑनलाईन सुविधेमुळे वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. केवळ एका क्लिकवर घरबसल्या बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पिंपरी, भोसरी विभागात 2015-16 या आर्थिक वर्षात एकूण 13 लाख 96 हजार वीज ग्राहकांनी 228 कोटी 61 लाख रुपयांचा ऑनलाईन वीज बिल भरणा केला होता. तर सन 2016-17 या वर्षात 18 लाख 98 हजार वीज ग्राहकांनी 312 कोटी 16 लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ऑनलाईन वीजभरणा करणार्‍यांची संख्या पाच लाखांनी वाढली असून, 83 कोटी 55 लाखांचा ऑनलाईन बिल भरणा वाढला आहे.

विविध सोयी-सुविधा
वीज ग्राहकांना मुदतीत चालू देयकांचा, तसेच थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांसह संकेतस्थळ आणि अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय छापील कागदासह ई-मेलद्वारेही बिल मिळविण्याची सेवा उपलब्ध आहे. तसेच गो-ग्रीन अंतर्गत छापील कागदाऐवजी वीज बिलासाठी फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीज बिलाचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेटबॅँकिंगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे.