एका ओळीच्या ठरावाच्या प्रतीक्षेत बळीराजा!

0

देशभरातील महत्वाच्या आणि लक्ष लागून असलेल्या निवडणुकांचा भाजपाच्या पारड्यात पडलेला निकाल आणि 4 दिवसांचा मोठा विश्राम घेतल्यांनंतर पुन्हा बुधवारी विरोधक आणि खुद्द सरकारचा भाग असलेल्या मित्रपक्षाने सरकारला कोंडीत पकडण्यात नियमितता ठेवली आहे. आता ’एका ओळीत ठराव मांडा आणि विषय संपवा’ अशा भूमिकेत विरोधी पक्षाने आपला पवित्रा कायम ठेवला आहे. दुसर्‍या आठवड्याची सुरुवातही गोंधळानेच झाल्याने आजही कामकाज झाले नाही. सर्वपक्षीय सदस्य कर्जमाफीच्या मुद्दयावर आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने तुरळक कामकाज वगळता काहीही कामकाज होऊ शकले नाही.

सध्या अधिवेशनात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकाच मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याशिवाय आता सरकारसमोर पर्याय नाही असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे तर विरोधी पक्ष उद्दिष्टाच्या जवळ असल्याचे फील करत आहे. शेतकरी कर्जमाफीपेक्षा सध्या तरी मोठा मुद्दा नाही. आता आम्हाला आश्वासन नको. सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नसल्याचे अगदी जनतेच्या मनातली भूमिका विरोधी पक्ष ठामपणे मांडत असल्याने मुख्यमंत्री विधानभवनातून काढता पाय घेत आहेत.

सरकार कर्जमाफीच्या मुद्दयावर सकारात्मक आहे, असे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. मात्र निर्णय घेण्यात सरकारला नेमक्या काय अडचणी येताहेत? हे समजून घ्यायला देखील विरोधी पक्ष तयार नाही. सरकारतर्फे बँकांच्या फायद्याचा मुद्दा समोर केला जात असला तरी तो प्रभावी ठरत नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी यावर तोडगा सांगताना, सरकारची आर्थिक परिस्थिती प्रथमदर्शनी चांगली दिसत असून खर्चाची प्राथमिकता ही कष्टकरी वर्गासाठी असणे आवश्यक आहे. बँकांची अडचण असेल तर शेतकर्‍यांच्या हातात पैसे द्यावेत असे सांगत आपल्या कधीकाळी अर्थमंत्री असल्याची चुणूक दाखवली असली तरी त्यांच्या या सल्ल्यातील अव्यवहार्यता स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे.

शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून खलबते होत आहेत. गुप्त बैठका वाढल्या आहेत. सरकार हतलबतेच्या दिशेने वाटचाल करत असतानाही अद्याप वकिली माईंड असलेले मुख्यमंत्री सभागृहात जास्त वेळ दिसलेले नाहीत. मुंबईच्या ‘महापौर’पदाच्या घोषणेसारखा एखादा सिक्सर मारायच्या तयारीत तर मुख्यमंत्री नाहीत ना? असा प्रश्न मनात येतोय. आणि तो सिक्सर जर शेतकरी हिताशी संबंधीत असेल तर त्याचे निश्चितच शेतकरी वर्ग स्वागत करेल आणि सीएमची इमेज अजून पारदर्शी आणि उज्ज्वल होईल यात शंका नाही. मात्र असं काही होईल अशी शक्यता कमीच आहे.

निलेश झालटे – 9822721292