एकाच दिवशी चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

0

नाशिक । कर्जबाजारीपणा आणि त्यातच अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच हादरला आहे. यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी चार शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकरी महिलेचाही समावेश आहे.

जिल्ह्यात रविवार व सोमवार दोन दिवस असे अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा व डाळींब या पिकांचे अगोदरच भाव गडगडले असताना अवकाळीचा मोठा फटका शेतीला बसला. त्यामुळे शेतकर्‍यांनी हिंमत सोडली असून आत्महत्यासारखा पर्याय ते स्वीकारत आहेत. सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील भगवान नानू गावित (45) या शेतकर्‍यांने स्वतःला पेटवून घेत आपले जीवन संपवले. विशेष म्हणजे सुरगाणा तालुक्यातील शेतकर्‍याची ही पहिलीच आत्महत्येची घटना आहे. बागलाण तालुक्यातील करंजाड येथील सुनील शांताराम देवरे(27) आणि कंधाणे येथील नितीन कडू बिरारी ( 25) या तरूण शेतकर्‍यांनी विषारी औषध प्राशन करून मरण कवटाळले. तर निफाड तालुक्यातील करंजगाव येथील अनिता चव्हाण या महिलेनेही आत्महत्या केली आहे.