Private Advt

एकनाथराव खडसेंना ईडीकडून दणका; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जावयाला अटक

मुंबई : भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांना ईडीकडून मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे आता एकनाथराव खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सर्व्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.
खडसे यांच्या म्हणण्यानुसार ‘‘मूळ जमीनमालकाने संपादित जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतला नसल्याने व भूसंपादन प्रक्रिया व्यपगत झाल्याने तोच आजही जमीनमालक आहे व तो ‘ती’ जमीन कुणालाही विकू शकतो. म्हणून आपणही त्याच्याकडून अशी जमीन घेऊ शकतो. त्यात बेकायदेशीर काही नाही’.

ईडी लावली तर मी सीडी लावेन

एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपाने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांच्यामागे ईडीचा सरेमिरा सुरु झाला परंतू त्यांनी सीडी काही समोर आलीच नाही. आता तर थेट त्यांच्या जावायाला अटक करण्यात आली आहे.