उशाशी मोबाईल ठेवून कुटुंबीय गच्चीवर झोपले ; साखरझोपेत चार मोबाईल लंपास

0

जळगाव – घराच्या गच्चीवर उशाशी मोबाईल ठेवून झोपणे कुटुंबियांना चांगलेच महागात पडले आहे. कुटुंबिय साखरझोपेत असतांना चोरट्यांनी चारही मोबाईल लांबविल्याची घटना एमआयडीसी परिसरातील रामनगरात घडली. कुटुंबातील एक जण नळाला पाणी येणार असल्याने पहाटे चार वाजता उठल्यावर मोबाईल लंपास झाल्याचा प्रकार समोर आला.

पोलिसांकडून माहिती अशी की, शैलेश हिरालाल लुंकड (वय-25) रा. रामनगर, मेहरूण हे आई, वडील तसेच आजोबांसह राहातात. 15 मे रोजी रात्री 10 वाजता जेवण करून वरच्या गच्चीवर आई-वडील व आजोबांसह झोपायला गेले. त्यावेळी सर्वांनी आपआपले मोबाईल झोपतांना आपल्या उशीशी ठेवले. नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता नळाला पाणी येणार असल्याने शैलेश लुंकड हे उठले. त्यावेळी त्यांचा उशाशी ठेवलेला मोबाईल दिसून आला नाही. त्यांनी आई, वडील, आजोबा यांना उठवून मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांचेही मोबाईल लंपास असल्याचे समजले. इतरत्र शोध घेतला असता, मोबाईल मिळून आले नाही. मोबाईल चोरीची खात्री झाल्यावर लुंकड यांनी सोमवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार प्रत्येकी 10 हजार, 4 हजार, 3 हजार व 1 हजार असे एकूण 18 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील करीत आहेत.

Copy