उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून होणार आमदार?; मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा

0

मुंबई: कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना आता शिवसेनेकडून विधानपरिषदेवर पाठविण्याची तयारी सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात अली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेतील वादात उर्मिला मातोंडकर हिने उडी घेतली होती. तिने कंगनाला चांगलेच सुनावले होते. याचेच फळ उर्मिलाला मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे कळते.