उमेदवारांच्या भवितव्यावर आज होणार फैसला

0

भुसावळ । जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या मतमोजणीसाठी यावल रोडवरील शासकीय गोदामात गुरुवार 23 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणीसाठी 16 टेबल व 98 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठीची मतमोजणी एकाच वेळी होणार असून निवडणूक निकाल साधारणत: 4 तासात लागतील, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी सांगितले.

पोस्टल मतदानाची स्वतंत्र मतगणना
मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरूवात होणार असून तत्पूर्वी 23 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीकामी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येवून ईव्हीएमबाबत खात्री केल्यानंतर मतमोजणी सुरू होईल. तसेच यावेळी पोस्टल मतदानाची मतगणना स्वतंत्र 2 टेबलांवर करण्यात येणार आहे.

गट, गणनिहाय होणार मोजणी
गट व गणांमध्ये कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 7 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे निवडणूक निकाल लवकर हाती लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गटासाठी 8 तर गणासाठी 8 टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी – जिल्हा परिषद गटासाठी करण्यात येणार्‍या मतमोजणीसाठी 8 टेबल लावण्यात येणार असून संबंधित गणाच्या मतमोजणीसाठी सुध्दा स्वतंत्र 8 टेबल लावण्यात येणार आहे.

निकालास मिळणार गती
मतमोजणीसाठी तब्बल 98 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे निवडणूक निकाल लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे. साधारणत: सर्व निवडणूक प्रक्रिया 4 ते 5 तासात पार पडून निकाल हाती येण्याची शक्यता आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र मिडीया कक्ष स्थापन करण्यात येणार असून पत्रकार व छायाचित्रकारांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी पत्रकारांना माहिती पुरवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मतमोजणीसाठी पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी असा 150 पोलिस प्रशासनाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावल रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली असून रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत.