उमाळ्याजवळ गायी असल्याच्या संशयावरुन ट्रक पेटविण्याचा प्रयत्न

0

वाहनाचे नुकसान करत चालकासह एकाला मारहाण

जळगाव : गायी असल्याच्या संशयावरुन दहा ते बारा जणांनी बैल घेऊन जाणारा ट्रक अडवून चालकालासह एकाला बेदम मारहाण करुन ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उमाळा व चिंचोली गावाजवळ घडली. यादरम्यान अज्ञात संशयितांनी चालकाकडील 20 हजार रुपये लांबवून गाडीच्या काचा फोडत नुकसानही केले. याप्रकरणी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जावेद खान अजगर खान (वय 38, रा.सावदा, ता.रावेर) हा तरुण रऊफ शेख यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र.एम.एच.04 इ.एल 5153) चालक आहे. शनिवारी जळगाव येथील गुरांच्या बाजारातून 1 लाख 86 हजार रुपये किमतीचे 8 बैल घेऊन ट्रक नशिराबादमार्गे नेरी येथे जात असताना दुपारी चार वाजता उमाळा फाट्याजवळ दहा ते बारा जणांनी ट्रक अडविला. गाडीत काय आहे, असे म्हणत चालक जावेद व सोबतचा सहकारी शेख नासीर शेख कदीर यास मारहाण केली. तसेच गाडीचे नुकसान करुन त्यातील बैल जबरदस्तीने उतरवून पळवून नेले. यादरम्यान संशयितांनी ट्रकमधील सीटाला आग लावत 20 हजार रुपये लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Copy