उमवितर्फे 3 जानेवारीला जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने 3 जानेवारी रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विद्यापीठ परिसर या चार ठिकाणी जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदा स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळत असून चारही ठिकाणी एकूण 1130 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत तर 1987 विद्यार्थी सहभागी होत आहेत. अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी सहा विषयनिहाय विभाग करण्यात आले असून पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी आणि शिक्षक अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पोस्टर व मॉडेल या दोन्ही सादरीकरणात भाग घेता येणार आहे. 3 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशाळेसाठी होणार्‍या स्पर्धेसाठीचे उद्घाटन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. विद्यापीठ प्रशाळेसाठी 175 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून 302 विद्यार्थी सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून प्रा.व्ही.एल.माहेश्वरी काम पाहणार आहे.

जळगावात येथे होणार स्पर्धा
जळगाव जिल्हयाची स्पर्धा जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट येथे सकाळी 9 ते 5 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाभा अनुसंसाधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.गुलशन रेलर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर राहतील. प्रा.डी.जी.हुंडीवाले हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. रायसोनी इन्स्टिटयूट येथे होणार्‍या स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार 3 रोजी सकाळी 7.30 नेहरु पुतळा, रेल्वे स्टेशन रोड व मध्यवर्ती बसस्थानकाजवळील महात्मा गांधी उद्यान येथून बसची व्यवस्था विद्यापीठाच्या वतीने करण्यात आली आहे. येथील स्पर्धेसाठी 431 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून 833 विद्यार्थी सहभागी होतील. निरीक्षक म्हणून विद्यापीठाच्या वतीने प्रा.आर.एल.शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळ्यात स्पर्धेसाठी 351 प्रवेशिका प्राप्त
धुळे जिल्हयाची स्पर्धा विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे होणार असून यात 351 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून 561 विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे व महापालिका आयुक्त डॉ.संगीता धायगुडे प्रमुख पाहुणे म्हणून व संस्थेचे चेअरमन डॉ.दिलीप पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. धुळे येथे प्रा.जे.बी.साळी हे निरीक्षक राहतील.

नंदूरबार जिल्ह्याची स्पर्धा
नंदुरबार जिल्हयाची स्पर्धा जी.टी.पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,नंदूरबार येथे होईल. या स्पर्धेसाठी 173 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून 291 विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव अध्यक्षस्थानी राहतील. या स्पर्धेसाठी डॉ.डी.एस.दलाल निरीक्षक आहेत अशी माहिती बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर व अविष्कार 2016 चे समन्वयक प्रा.ए.पी.डोंगरे यांनी दिली.