उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली : फैजपूरच्या वृद्धाचा मृत्यू

फैजपूर : उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर हा अपघात झाला. रमेश दगडू वारके (रा.श्रीराम कॉलनी, फैजपूर) असे मयताचे नाव आहे.

उभ्या ट्रॅक्टरवर धडकली दुचाकी
यावल तालुक्यातील वड्री येथील जे.डी.सी.सी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक तथा फैजपूरातील श्रीराम कॉलनी येथील रहिवासी रमेश दगडू वारके (60) हे कामानिमित्त यावलला गेले होते. बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता यावलकडून फैजपूरला जात होते. हंबर्डी-फैजपूरच्या रस्त्याच्या मध्यवर्ती भागात एक उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीची धडक झाली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होत ते जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,हवालदार देविदास सुरदास, महेंद्र महाजन, विनोद पाटील यांना पाठवल्यानंतर रमेश दगडू वारके यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मयत रमेश वारके हे वड्री येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेला असल्याने वड्री गावात या संदर्भात माहिती मिळताच वड्री गावचे सरपंच अजय भालेराव, अतुल भालेरावसह अनेक नागरीकांनी यावल ग्रामीण रुग्णालय गाठले. रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बरेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत रमेश वारके यांच्या पश्‍चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

Copy