उपमहापौर यांच्या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या तक्रारी

0

जळगाव: उपमहापौर सुनील खडके यांच्या जनता दरबारात गुरुवारी शहराच्या विविध भागातून आलेल्या नागरीकांनी समस्यांबाबतच्या तक्रारी मांडल्या. रस्त्यांवरील खड्डे, सांडपाणी वाहून नेण्याच्या व्यवस्थेचा अभाव त्यामूळे परिरात व रस्त्यावर होणारा चिखल आणि रोगराई पसरण्याचा धोका, स्ट्रीट लाइट नसल्याने होणारा अंधार, तुंबणा-या गटारी, कचरा- धुळ आदी समस्यांबाबत या जनता दरबारात उपमहापौर सुनील खडके यांचे लक्ष वेधण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातच पडदे टेबल व खुर्च्यांची बैठक करुन उभारण्यात आलेला हा जनता दरबार आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. आणखी 2 गुरुवारी हा जनता दरबार भरविण्याचे नियोजन असल्याचेही उपमहापौर सुनील खडके यांनी जाहीर केले.

उपमहापौर खडके यांच्यासह महापौर भारतीताई सोनवणे, आयुक्त सतीश कुळकर्णी, माजी स्थायी समिती सभापती ड शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, आरोग्य समिती सभापती चेतन सनकत, अतिक्रमण समिती सभापती किशोर बाविस्कर, नगरसेवक कुलभूषण पाटील, पार्वताताई भिल, माजी नगरसेवक मनोज काळे यांच्यासह सहा. आयुक्त पवन पाटील, नगरसचिव सुनिल गोराणे, यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आजच्या जनता दरबाराला उपस्थित होते.

स्ट्रीट लाईट नाहीत, जेथे आहेत तेथे ते सुरळीत सुरु नाहीत. रात्री परिसर, काही गल्ल्या अंधारात बुडालेल्या आहेत.काही भागात स्वच्छता कर्मचारीच पोहोचत नाहीत त्यामुळे परिसर झाडून स्वच्छ केले जात नाहीत. गटारी तुंबलेल्या असतात. अमृत योजना – भुयारी गटारी यांसाठी चा-या खोदल्या जात आहेत. मात्र या चा-या वेळच्या वेळी योग्य पध्दतीने बुजल्या जात नसल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहेत. याबाबत शहराच्या विस्तारित भागातील नागरिकांनी जनता दरबारात नाराजी व्यक्त केली.विविध तक्रारींबाबत जागीच कार्यवाही योजण्यात आली व राहिलेल्या इतर लिखित स्वरुपातील तक्रारी हया संबधीत विभागांकडे निर्देशित करण्यात येणार असून, त्यांच्या निपटार्‍यासाठी विभाग प्रमुखांना सुचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती उपमहापौर सुनिल खडके यांनी दिली.

स्वच्छता व्यवस्था, आरोग्य, सार्व बांधकाम, पाणी पुरवठा, प्रकल्प, नगर रचना, करवसुली, सामान्यप्रशासन, आस्थापना, अर्थविभाग , अग्नीशमन व आणिबाणी सेवा आदी विभागांचे अधिकारी जनता दरबारास उपस्थित होते. जनसेवेची तळमळ आणि महापालिका प्रांगणात उपमहापौर यांचा जनता दरबार भरवून पाडलेला एक नविन पायंडा याबद्दल या जनता दरबाराच्या प्रारंभीच नागरिकांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतीमा देउन उपमहापौर सुनील खडके यांचा गौरव करण्यात आला. आयुक्त सतिश कुळकर्णी यांच्या हस्ते ही प्रतिमा प्रदान करण्यात आली.

Copy