उपनगराध्यक्षपदी लोणारी बिनविरोध

0

भुसावळ : पालिकेत शनिवार 30 रोजी विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पदभार स्विकाला. तर उपनगराध्यक्षपदी युवराज लोणारी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शहरातून ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष रमण भोळे यांचे बुलेटवर आगमन झाले. त्यांच्या मागे आमदार संजय सावकारे तर सोबत इतर वाहनांवर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मनोज बियाणी, किरण कोलते, मुकेश पाटील यांसह नगरसेवकांनी प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांचे स्वागत केले. यानंतर पालिकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. सभेत उपनगराध्यक्षपदी युवराज लोणारी यांची तर स्विकृत सदस्यपदी चंद्रशेखर अत्तरदे, प्रा. सुनिल नेवे, मनोज बियाणी, अ‍ॅड. तुषार पाटील, पुष्पा सोनवणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी देखील पालिकेत भेट देऊन नगराध्यक्षांसह सर्वांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. सभा आटोपल्यावर पालिकेसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात येऊन मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. हि मिरवणूक गांधी चाहक, लक्ष्मी नारायण मंदिर, मरिमाता मंदिर, जवीाहर डेअरी, गर्ल्स हायस्कूल, पांडूंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन, वसंत टॉकीज या मार्गाने मिरवणूक काढण्यात येऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विजयाचा उत्सव साजरा केला.

जनाधार पार्टीचा बहिष्कार
विशेष सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक व स्विकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून स्वत: लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे होते. त्यांना मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी सहकार्य केले. सुरुवातीस कोरम पुर्ण होत नसल्यामुळे सदस्य संख्या पुर्ण होण्याची वाट पहावी लागली तेव्हा जनाधार विकास पार्टीच्या पुजा सुर्यवंशी व अरुणा सुरवाडे या दोन नगरसेविका आल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. या दोन नगरसेविका वगळता विरोधी गटातील एकही नगरसेवक विशेष सभेला हजर नव्हता. त्यामुळे जनाधार विकास पार्टीने या सभेवर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. यामध्ये एकूण 32 नगरसेवक हजर होते.

जनतेचे प्रेम व विश्‍वास आम्हाला मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करु शकलो. विकासकामात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. प्रामाणिकपणे जनतेच्या समस्या सोडविल्या जातील. शहराचा सर्वांगिण विकास हेच आमचे लक्ष्य आहे. – रमण भोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष

पालिका निवडणूकीत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यश मिळाले. शहराचा विकास थांबलेला असून त्याला गती देण्यात येईल. पाच वर्षात विकासकामांसाठी भरीव निधी आणून शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार. सर्वप्रथम रस्ते व पाण्याची समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. – युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष

अमृत योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पुढील 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची सुरुवातच यशस्वी झाली असून महत्वाच्या कामांना गती देऊन पुर्ण केली जातील. केंद्र व राज्यातून मदत आणून विकास कामांना सुरुवात होईल. तसेच पालिकेच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न करुन शहरात चांगले वातावरण निर्मिती करण्यावर आमचा विशेष भर राहिल.
संजय सावकारे, आमदार