उपद्रव संपला की त्यांचा विनायक मेटे केला जातो!

0

भव्य स्मारकाची मूळ कल्पना खरंतर मेटेंची, पण ज्याची काहीच ताकद नाही त्याची कल्पना आपण राबवतो आहोत हेच मुळी भाजप सरकारला सहन होत नाही हेच मेटेंबाबत घडणार्‍या घडामोडी सांगून जातात. मेटेंसाठी आता भाजपचे दोर कापलेले आहेत ही बाब कोणत्याही राजकीय समज असणार्‍या व्यक्तीला सांगण्याची गरज नाही.

ज्याच्या हाती ससा तो पारधी किंवा बळी तो कानपिळी असे आपण ताकदवान व्यक्तीबाबत बोलत असतो. ताकद, सामर्थ्य किंवा उपद्रवक्षमता ज्याची जास्त असेल त्याला कुर्निसात करण्याचा समाजात प्रघात असतो. विनोदाने असे म्हटले जाते की.. मांजर आजारी असले की उंदीरही त्याच्या खोड्या काढतात, म्हणून सार्वजनिक जीवनात ज्याचा जेवढा उपद्रव तेवढा त्याचा सन्मान हे समीकरण अलीकडे होऊन बसले आहे. राजकारण हा प्रांत त्यासाठीच प्रसिद्ध आहे, मॅन, मनी आणि मसल पॉवर ज्याच्याकडे असते त्याच्या वळचणीला सगळे राजकीय पक्ष आसरा शोधतात. राजकारण हा अशा लोकांचाच प्रांत हल्ली बनत चालला असल्यामुळे डोक्यात काय आहे हे महत्त्वाचे राहिले नाही, तुमच्याकडे किती डोकी आहेत हे पाहण्यावर अधिक कल वाढत आहे. संघटना, पक्ष असो की सामाजिक चळवळ या सगळ्यांना उपद्रवाचे माप लावले जाते. तुमचा उपद्रव संपला की गल्लीतला काडी पहिलवानसुद्धा.. ये देऊ क्या खर्चा पानी? म्हणण्याचे धाडस करून जातो.

राजकारणात उपद्रवक्षम व्यक्तीच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना हजारदा विचार केला जातो, निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात हे तपासले जाते. अनेकदा उपद्रव हे प्रभावी हत्यार आणि कधी कधी ढालीचे काम करीत असते. परंतु, या हत्याराची धार बोथट झाली की तुम्ही आजारी मांजर झालेच समजा. हल्ली शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे हे या आजारी मांजराच्या अवस्थेत दिसत आहेत. मराठा समाजाचे नेते म्हणून ज्यांचा एकेकाळी दरारा होता त्या मेटेंची अवस्था समाजातील तरुणांनी काय करून टाकली हे कुणाला सांगण्याची गरज नसावी. राजकारणात ज्याच्या पाठीशी लोकांचे, ज्यांच्या मागे समाजाचे पाठबळ असते त्याच्या शिव्यांनाही ओव्यांचा सन्मान मिळतो हे आपण अनुभवत आहोत. मात्र, हे पाठबळ कमी अथवा क्षीण झाल्याचा सुगावा जरी लागला तरी नेत्याचे आजारी मांजर कधी होते याचा पत्ता लागत नाही. विनायक मेटे यांचे मांजर झाल्याचा शोध खरंतर भाजपला निवडणुकीनंतर लागला.

जो नेता आमदारकीच्या एवढ्या वर्षात एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधून बांधू शकला नाही, ज्याने आपल्या गृह जिल्ह्यात सांगायला एखादे कामही निर्माण केले नाही त्याची झेप कुठपर्यंत असेल हे शोधण्यात भाजपचा कुणी हात पकडू शकत नाही हे मान्य करायला हवे. विनायक मेटे आता कागदी व्याघ्रराज उरलेत याचा साक्षात्कार भाजपाला होताच त्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली. सरकार येताच मेटे मंत्री असतील असे घसा फाडून सांगणारे भाजप नेते दोन वर्षांपासून तोंड लपवायला लागले आहेत. भारती लव्हेकर या एकमेव आमदारांना भाजपने कमळावर सामावून घेतल्याने शिवसंग्रामचा एकही आमदार असणार नाही याची काळजी घेऊन मेटेंना बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. मंत्रिमंडळ विस्ताराची डोळ्यात प्राण ओतून प्रतीक्षा करणार्‍या मेटेंना अपेक्षाभंग पदरी पडल्यावर त्यांच्या पंख छाटणीचा कार्यक्रम सध्या राबवला जातोय. मंत्रिपद नाही, शिवस्मारक कार्यक्रमात सन्मान नाही, एखादे महामंडळसुद्धा नाही एवढा उपमर्द केल्यावर आता स्मारक समितीचे अध्यक्षपद कसे काढता येईल हे बघितले जात आहे. अरबी समुद्रात भव्य स्मारकाची मूळ कल्पना खरंतर मेटेंची, पण ज्याची काहीच ताकद नाही त्याची कल्पना आपण राबवतो आहोत हेच मुळी भाजप सरकारला सहन होत नाही हेच मेटेंबाबत घडणार्‍या घडामोडी सांगून जातात. मेटेंसाठी आता भाजपचे दोर कापलेले आहेत ही बाब कोणत्याही राजकीय समज असणार्‍या व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. त्यांनाही ही कल्पना आल्यामुळे मातोश्री वारी घडली असावी, या कुजबुजीला भरपूर वाव आहे.

मेटे – ठाकरे भेटीला बारा तास उलटत नाहीत तोच चंद्रकांत पाटील यांच्या दालनात 43 मराठा संघटनांची बैठक काय होते आणि मेटेंना शिवस्मारक समितीवरून काढण्याची मागणी काय होते, हे सगळे अचानक घडले आहे यावर विश्‍वास बसत नाही, एका पूर्वनियोजित कटाचा तो भाग नक्कीच वाटतो आणि राजकारणात शह-काटशह आणि कट हे सगळे क्षम्य असते किंबहुना त्यालाच काही लोक अस्सल राजकारण म्हणतात. मेटे ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्याच मराठा समाजाकडून त्यांना काढण्याची मागणी पुढे जीवनमरणाचा प्रश्‍न करून मेटेंना नारळ देण्याचे ठरले आहे, एखादे मुहूर्त पाहून तोही कार्यक्रम उरकला जाईल यात आता शंका राहिली नाही. मेटेंना असले राजकारण नवे नाही, कोणे एकेकाळी मराठा महासंघाचे अध्यक्ष किशनराव वरखिंडे यांना गाफील ठेवून विनायकराव जोशी सरांशी संधान बांधून विधानपरिषदेत पोहोचले आहेत ते अद्याप बाहेर आले नाहीत. मेटे हुशार, चाणाक्ष आहेत. परंतु, पाठबळ आणि भुजबळ क्षीण झाले की थांबा आणि पाहा एवढेच करायचे असते ते त्यांना सांगण्याची गरज नाही. उपद्रव काय असतो हे त्यांना आता नक्कीच कळले असेल. जे भाजपाला कळले ते जर मेटेंना उमजले नसेल, तर येणारा काळ कठीण आहे, भाजपला शिवरायांचे स्मारक वैदिक पद्धतीने बांधायचे आहे आणि सगळे श्रेय पक्षाच्या पदरात घ्यायचे आहे. उद्या याच स्मारकात पाठीवर धनुष्य आणि हातात गदा घेतलेले शिवराय दिसणार नाहीत हे सांगता येणार नाही म्हणून मेटे यांना नको आहेत.