उपचारात हलगर्जीपणा करणार्‍या तीन डॉक्टरांवर गुन्हा

0

निगडी : गरोदर महिलेच्या वेगवेगळ्या चाचण्या करून जन्माला आलेल्या बाळाच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यामुळे निगडी पोलिस ठाण्यात तीन डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गरोदर महिलेच्या पतीने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, डॉ. राणा दानप्पा (रा. यमुनानगर), डॉ. प्रीती जाधव (रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) व डॉ. भूपेंद्र सिंग (रा. यमुनानगर) या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 ते 25 मार्च दरम्यान यमुनानगर येथील राणा दानप्पा नर्सिंग होममध्ये घडला. याप्रकरणी उमेश विश्वनाथ स्थूल (वय 34, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपचार करताना हलगर्जीपणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यांच्या पत्नीची प्रसूतीसाठी डॉ. राणा दानप्पा यांच्या हॉस्पिटमध्ये नावनोंदणी करण्यात आली होती. या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्या घेण्यासाठी डॉ. दानप्पा हे स्वत: हजर न राहता त्यांच्या सहकार्‍यांकडून करून घेण्यात आल्या. 24 मार्च रोजी एनएसटी (गर्भाला ऑक्सिजन पुरवठ्याबाबतची टेस्ट) चाचणी करून घेतली. त्यामध्ये रक्तदाब वाढल्याचे सांगून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. डॉ. प्रीती जाधव यांनी त्यांना दोन वेळा तपासून पुन्हा वेगवेगळ्या चाचण्या करून प्रसूती होण्याचे औषध दिले. यामुळे त्यांना त्रास होत असतानादेखील डॉ. जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

बाळाच्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष
बाळाच्या जन्मानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बालरोग तज्ज्ञ डॉ. भूपेंद्र सिंग यांना बोलावण्यात आले. परंतु त्यांनीही बाळाकडे दुर्लक्ष केले. बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उमेश स्थूल यांच्या पत्नीने विकलांग मुलाला जन्म दिला. या प्रकरणी उमेश यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्याची दखल घेऊन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.