उद्यान आरक्षण उठवून निवासी गाळ्यांचा घाट

0
अजमेरा कॉलनीतील गट क्रमांक 79मधील प्रकार उघड
 स्थानिकांची संयुक्त संघर्ष समिती स्थापन विरोध; न्यायालयात जाण्याची तयारी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेने अजमेरा कॉलनीतील गट क्रमांक 79 येथील उद्यानाचे आरक्षण उठवून त्याजागी निवासी गाळे करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी गाळे करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. आम्हाला उद्यानच हवे आहे, अशी त्यांची मागणी आहे. या ठिकाणी उद्यानच साकारण्यात यावे, अन्यथा वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच लढा देण्यासाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. अजमेरा कॉलनीत अंतरीक्ष, सागर, ग्रीन फिल्डस सोसायटी, मनिष गार्डन, मेगा हाईट्स आणि स्वप्ननगरी अशा सोसायट्या आहेत. अंतरीक्ष आणि सागर या दोन्ही सोसायट्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर उद्यानाचे आरक्षण होते.
विरोधासाठी बैठका सुरू
अजमेरा कॉलनी परिसरातील नागरीकरण दिवसें-दिवस वाढत आहे. पाणी, वाहतुकीच्या प्रश्‍नांनातून या परिसरातील नागरिकांची आता कुठेतरी सुटका झाली आहे. त्यातच पुन्हा निवासी गाळे करण्याचा घाट घातला जातोय. या ठिकाणी उद्यानच विकसित करण्यात यावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. निवासी गाळ्यांचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली असून त्याविरोधात लढा देण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी ‘संयुक्त संघर्ष समिती’ची स्थापना केली आहे. समितीचे बैठकांचे सत्र सुरु आहे. वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यांची होती उपस्थिती
समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीला  भाऊसाहेब पांगारे, रवि खन्ना, संभाजी मगर, सुधाकर साटम, नितीन मंडलिक, दत्तानंद सोनवलकर, नागेश पवार, शंकर पिल्ले, हनुमंत पिसाळ, नरसिह्मन, किशोर बोरकर, राजेंद्र भोसले, वेणू पिल्ले, अनंत लावंड, अविनाश चौगुले, विनायक पाटील, उल्का शेडगे, रविंद्र उन्नीनाथन, रॉबिन मॅथ्यू, प्रसन्ना जोशी, गिरीश नाईक, पंडित साळुंखे आदी उपस्थित होते.
Copy