उद्यमशीलतेला चालना देणे गरजेचे

0

भुसावळ । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात केवळ शिक्षण देणे हा प्रमुख उद्देश न ठेवता विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या वैचारितकतेला व उद्यमशीलतेला चालना देणारे अभ्यासक्रम शिकवावे किंवा त्याप्रमाणे बदल करावे असे मत राज्य शासनाने स्थापन केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.जी. गायकर यांनी व्यक्त केले. येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविद्यालयाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंग, डॉ.बी.आर अय्यर, डॉ. पी.के.पेंडसे, डॉ.राहुल बारजिभे, प्रा.धीरज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. नुकत्याच स्थापन झालेल्या विद्यापीठाशी सध्या राज्यातील सध्या इंजिनियरिंग, माहिती व तंत्रज्ञान, औषधीशास्त्र (फार्मसी), आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग या विषयाशी संबंधीत 72 महाविद्यालये संलग्न असुन लवकरच त्चांची संख्या दुपटीने वाढणार आहे. संलग्नतेचा अर्ज करणार्‍या महाविद्यालयांची स्थानिक निरिक्षण समितीद्वारा पाहणी पूर्ण झाली.

उद्योजक तयार होण्याची गरज
या प्रत्येक ठिकाणी एक संचालक एक सहसंचालक व एक उपसंचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.एका उपसंचालकाची (औद्योगिक संबंध) नेमणुक केली जाणार असुन त्यांच्याकडे महाविद्यालये आणि स्थानिक व राज्यातील औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधण्याची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. सद्यकाळात मुलांनी व मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करणार्‍या डॉ. गायकर यांनी सांगितले की, दरवर्षी अंदाजे 14 लाख अभियंते देशातुन शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मात्र त्यापैकी किती जणांना आपण रोजगार देऊ शकतो ही शक्यता पण तपासावी लागते. नोकरीपेक्षाही जर विद्याथ्यार्ंंमध्ये उद्यमशीलता निर्माण केली पाहिजे. स्थानिक ठिकाणी काय हवे आहे, समाजाची काय गरज आहे याची उपयुक्तता लक्षात घेऊन उद्योजक तयार केले पाहिजे.त्यासाठी गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करणे गरजेचे आहे. हे बदल उद्यमशीलतेला प्रेरक असावेत असेही गायकर म्हणाले.

पाच ठिकाणी उघडणार क्षेत्रिय कार्यालय
आगामी 10 दिवसात समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. राज्यातील संलग्न नसलेल्या महाविद्यालयांना अर्जाद्वारे संलग्नता प्राप्त करण्याची दुसरी संधी मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जुनच्या पहिल्याच आठवडयात जाहिरातीच्या माध्यमातुन मिळणार आहे. विद्यापीठांतर्गत पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या चार ठिकाणी क्षेत्रिय कार्यालये (रिजनल सेंटर्स) राहणार असुन जळगांव, अमरावती, नांदेड, सोलापूर व कोल्हापूर या पाच ठिकाणी उपकेंद्र उघडण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण
विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना असे बदल करण्यासाठी अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाला 20 टक्के, तिसर्‍या वर्षाला 30 टक्के तर चौथ्या वर्षाला 40 टक्के अनुमती दिली जाणार असुन विद्यार्थ्यांनाही तसे स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच सनदी लेखापाल किंवा वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांप्रमाणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणार्‍या तिसर्‍या वर्षानंतर किमान 6-8 आठवडयाचे प्रशिक्षण नजीकच्या उद्योजकांच्या कारखान्यातुन किंवा औद्योगिक आस्थापनेतुन विद्यार्थ्याला घ्यावे
लागणार आहे.