उद्धव ठाकरेंवरील आरोपांची चौकशी होणार?

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांवर अवैध सावकारीचा जो आरोप खा. किरीट सोमय्या यांनी केला आहे तो गंभीर आहे; आणि याबाबत त्यांनी योग्य यंत्रणेकडे तक्रार केल्यास त्या यंत्रणेमार्फत नक्कीच या प्रकरणी चौकशी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. अवैध सावकारीप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ज्या कंपन्यांमधून हा प्रकार केला होता, त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरे यांनीदेखील अवैध सावकारी केल्याचा आरोप खा. सोमय्या यांनी केला आहे. उद्धव यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही सोमय्या यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेळोवेळी दिले आहे. उद्धव यांचे सात कंपन्यांशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना याप्रकरणी चौकशी होऊ शकते, असे सांगून सनसनाटी निर्माण केली.

… तर चौकशी होईलच!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खा. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कंपन्यांची कागपत्रे दाखवली आहेत. या कंपन्यांमध्ये अवैध सावकारी झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी उद्धव यांनाही जाहीरपणे याबाबत विचारले आहे. या कंपन्यांशी शिवसेनानेत्यांचा संबंध आहे का आणि असतील तर ते नेते कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? असे सोमय्यांचे प्रश्न आहेत. अशा गोष्टी ज्या तुमच्याकडे पुराव्यानीशी आहेत त्याचा राजकीय उपयोग करू नका. संबंधित यंत्रणेकडे ती कागदपत्रे सोपवा. ती यंत्रणा त्याबाबत कारवाई करेल, असा सल्ला आपण सोमय्या यांना दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. भुजबळांची जशी ईडीने चौकशी केली, तशी चौकशी उद्धव ठाकरे यांची व शिवसेनेच्या नेत्यांची होणार का?, असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मी तसे म्हटलेले नाही पण जर खरेच अवैध सावकारी झाली असेल तर चौकशी होईलच, असे त्यांनी सांगितले.