उदात्त संकल्पनेची हत्या

0

दिल्लीत विधानसभा पोटनिवडणूक व महापालिका मतदानात आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर एकच प्रश्‍न विचारला जात आहे. या पक्षाला भवितव्य उरले आहे काय? अनेकांनी तर त्या पक्षाचा मृत्यूलेखही लिहायला घेतला आहे. पण राजकीय पक्ष वा सार्वजनिक संस्था अशा एकाएकी संपत नसतात किंवा अस्तंगत होत नसतात. कारण त्यांचा एक ढाचा असतो. संघटना असते. म्हणूनच एका पराभवाने वा त्यांचा शेवट शक्य नसतो. साहजिकच आम आदमी पक्ष अशा पराभवामुळे संपुष्टात येण्याची बिलकूल शक्यता नाही. तेच तर त्या पक्षाचे अनेक नेते बुद्धीची कसरत करून पटवून देऊ पाहत आहेत. त्यात तथ्यही आहे. आपच्या एका नेत्याने भाजप 1984 सालात कसा नामशेष झाला होता व आज देशाची सत्ता काबीज करून बसला आहे, त्याचेही उदाहरण दिलेले आहे. वरकरणी बघितल्यास हा युक्तिवाद चटकन पटणारा आहे. पण अशा तुलना खरेच योग्य असतात काय? भाजपला जेव्हा लोकसभेत अवघ्या दोन जागाच जिंकता आल्या, तेव्हाच्या निवडणुकीची पार्श्‍वभूमी काय होती? इंदिराजींची अतिरेक्यांकडून पंतप्रधान निवासात हत्या झालेली होती आणि त्यातून जी अनाकलनीय भीतीची लाट उसळलेली होती, तिने अननुभवी राजीव गांधींना अपूर्व विजय मिळवून दिला होता. त्यात जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्ष वाहून गेलेले होते. भाजप त्यापैकी एक होता. म्हणूनच भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या असे सांगताना अन्य सर्वच पक्षांचा त्या सहानुभूतीच्या लाटेचा पालापाचोळा झाल्याचे लपवून चालणार नाही. कोणी तसे करू बघतो, तेव्हा त्याला दिशाभूल करायची असते, हे विसरता कामा नये. थोडक्यात आजच्या आप पराभवाची तेव्हाच्या भाजपशी तुलना करता येत नाही. कारण आज तितकी मोठी मोदीलाट दिल्लीत नव्हती आणि आपचा पराभवही तितका दारुण नाही.

दोन वर्षांपूर्वी आपने दिल्ली मध्यावधी विधानसभेत अपूर्व यश मिळवले, त्याची कारणमिमांसा केली तर ते त्या पक्षाचे वा केजरीवाल यांचे यश कमी व भाजपचे अपयश अधिक होते. त्याचा एकत्रित परिणाम आपने अपूर्व यश मिळण्यातून दिसला. खेरीज आधीच्या काळात केजरीवाल टोळीने ज्या संकल्पना लोकांच्या मनात भरवल्या होत्या, त्याला पुरेशी संधी देण्याची इच्छाच इतका मोठा चमत्कार घडवून गेली होती. ती केजरीवाल यांची लोकप्रियता वा त्यांच्या पक्षावर दिल्लीकरांनी दाखवलेला तो विश्‍वासही नव्हता. प्रचलित राजकारण बदलण्याची स्वप्ने त्यांनी दाखवली होती आणि म्हणूनच त्या प्रयोगाला संधी देण्याची भूमिका मतदाराने घेतलेली होती. म्हणूनच तेव्हा झालेले मतदान एका पक्षाला वा केजरीवाल यांनाही झालेले नव्हते. तो एका उदात्त संकल्पनेला लोकांनी दिलेला कौल होता. भ्रष्टाचारमुक्त, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून होऊ शकणारा कारभार व लोकाभिमुख सरकार अशा कल्पना लोकांना भावलेल्या होत्या. म्हणूनच लोकसभेच्या सर्व जागा भाजपला देणार्‍या दिल्लीकरांनी विधानसभेच्या जवळपास सर्व जागा केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला देऊन टाकल्या. त्यात ़फुकट पाणी वा वीजपुरवठ्या़चे अर्धे बिल इतकीच अपेक्षा नव्हती. त्यापेक्षाही अन्य पक्षांपेक्षाही वेगळे पारदर्शक लोकहिताचे राजकारण, ही खरी अपेक्षा होती. केजरीवाल यांना त्याचा अर्थ उमजलाच नाही. त्यांनी या विजयानंतर आपली तुलना मोदींशी करायला सुरूवात केली आणि तिथून सर्व काही बिघडत गेले. लोकांनी पर्यायी मोदी म्हणून आप पक्षाला इतके बहुमत दिलेले नव्हते, तर त्यांनी प्रस्तुत केलेल्या राजकीय प्रयोगाला कौल दिला होता. लोकांना तो प्रयोग यशस्वी होताना बघायचा होता आणि त्यात अन्य कुठलाही व्यत्यय नको, म्हणूनच असे निर्विवाद बहुमत बहाल केले होते. त्याच बाबतीत लोकांची पूर्ण निराशा झाली व केजरीवाल यांनी ती निराशा केली.

ज्या प्रकारचा पोरखेळ प्रत्येक बाबतीत विरोधाची भूमिका घेऊन केजरीवाल करीत गेले, त्यापेक्षा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष संसदेत वेगळे काय करतो आहे? नाव वेगळे व नेता वेगळा, बाकी आम आदमी पक्ष देशातील अन्य पक्षांसारखाच वागत चालला होता. हे असेच निव्वळ विघातक हेवेदाव्याचे राजकारण करायचे होते, तर केजरीवाल भाजपा विरोधातल्या कुठल्याही अन्य पक्षातही जाऊ शकले असते. त्यासाठी नव्या वेगळ्या पक्ष स्थापनेची अजिबात गरज नव्हती. पण त्यांनी तसे केले नाही. राजनीती सुधारणे आये है, अशी गर्जना करून त्यांनी वेगळेपणाचा हवाला लोकांना दिला होता. पण दोन वर्षांतला दिल्लीकरांचा अनुभव काय आहे? तर अन्य कुठल्याही पक्षासारखी अरेरावी, भ्रष्टाचार वा विघातक सत्तालंपटता, केजरीवाल यांनीही करून दाखवली. ज्याला भ्रष्टाचार संबोधत त्यांनी वेगळ्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याचाच अवलंब करीत केजरीवाल व त्यांचे सहकारी वाटचाल करीत गेले. किंबहुना प्रचलित अन्य पक्षांच्याच दुर्गुणांचा अधिक सढळ उपयोग आपमध्ये होताना लोकांनी पाहिला. या गडबडीत वेगळ्या नव्या राजकीय संकल्पनेचा त्यांनी कधी बळी घेतला, ते त्यांच्याही लक्षात आले नाही. पण लोक अतिशय सावध असतात. त्यांची बारीक नजर होती आणि सामान्य जनता युक्तिवादाने फ़सत नाही. विरोधकांना वा अन्य पक्षांना शाब्दिक युक्तिवादाने केजरीवाल समर्थक गप्प करू शकले, म्हणून जनतेच्या डोळ्यात धूऴफेक करू शकले नाहीत. लोकांना केजरीवाल मुख्यमंत्री बघून समाधान नव्हते, तर दिल्लीकरांना नव्या राजकारणाचा सुखद प्रयोग प्रत्यक्ष अनुभवायचा होता. तिथेच त्याची फ़सवणूक झाली. कारण त्यांच्या वाट्याला बदमाश राजकारण करणारा सत्तालंपटांचा जुनाच पक्ष आलेला होता. जो तोंडाने पारदर्शकता बोलत होता आणि बाकी सर्व भानगडी व भ्रष्टाचार राजरोस करीत होता.

साहजिकच या पाच वर्षांत देशाच्या राजकारणामध्ये आणखी एका राजकीय पक्षाची भर पडलेली आहे. शेकडो लहानमोठे पक्ष जसे चालतात व आहेत, तसाच आणखी एक पक्ष भारताला मिळाला आहे. त्यात काहीही उदात्त उरलेले नाही किंवा राजकीय परिवर्तनाची शक्यता शिल्लक उरलेली नाही. अन्य पक्षतली भांडणे, सत्तालंपटता वा भ्रष्टाचार जसाच्या तसा याही पक्षात आहे. अन्य कुठल्याही राजकारणात भामटेगिरी चालते, तीच तशीच्या तशी आम आदमी पक्षातही बघायला मिळाली. फ़रक असेल तर तो प्रमाणाचा! जुन्या प्रचलित पक्षात थोडीफ़ार तरी लाजलज्जा आहे. लोक काय म्हणतील, त्याचा धाक इतर पक्षांना आहे. पण आपचे तथाकथित पवित्र लोक पापाने बरबटलेल्यांनाही लाजवतील, इतके बेशरम असल्याचे लोकांना अनुभवावे लागले. त्याही बाबतीत लोकांनी तक्रार केली नसती. राजकीय नेते व पक्षांकडून तशी़च अपेक्षा बाळगली जाते. पण हा पक्ष वेगळा असेल वा असावा, इतकीच अपेक्षा होती. पण त्याच अपेक्षा वा पारदर्शक राजकारणाच्या संकल्पनेचा गळा केजरीवाल यांनी अतिशय निर्दयपणे घोटला. चोरी करायची आणि उलट पुरावे मागायचे, इतका निर्लज्जपणा राजरोस त्यांनी केला. त्यामुळे आजच्या राजकारणात त्यांना संपवता येणार नाही. इतर पक्षांप्रमाणेच कमीअधिक प्रमाणात त्यांचाही पक्ष राजकीय परिसरामध्ये टिकून राहील. पण ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, त्यांचा केव्हाच मृत्यू झाला आहे. राजकीय सुधारणांविषयी ज्या आकांक्षा त्यांनी निर्माण केल्या ,त्याचाही केव्हाच बळी पडला आहे. पक्ष नावाचा देह कायम आहे, पण त्यातली संकल्पना नावाची चेतना कधीच निघून गेली आहे. केजरीवाल व त्यांचे सहकारी आज ज्याला कवटाळून बसले आहेत, तो लोकपाल आंदोलनातून उपजलेल्या अपेक्षा व संकल्पनेचा मुडदा आहे. हे हत्याकांड अन्य कोणी नाही, खुद्द महत्त्वाकांक्षी केजरीवालांनीच केलेले आहे.