उत्तर प्रदेशात मोदी मँगोनंतर आता ‘योगी मँगो’

0

लखनौ । मोदी मँगोनंतर उत्तर प्रदेशात आता ‘योगी मँगो’ तयार झाला आहे. उत्तर प्रदेशातले मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत नव्या जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे. या आंब्याचे नाव त्यांनी योगी मँगो असे ठेवले आहे. करेला आणि दशेरी आंब्यांच्या वैशिष्ट्यांनी बनलेला हा आंबा बारीक आणि लांब आहे. ही जात स्वतःच विकसित झाली असून, जेव्हा लोकांनी तो पाहिला तेव्हा अनेकांनी त्याला योगी आदित्यनाथांचे नाव देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे नाव देण्यात आले आहे. कलीमुल्लाह यांच्याकडे ऐश्‍वर्या आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचेही आंबे आहेत.

74 वर्षीय कलीमुल्लाह यांची आमराई लखनऊपासून 30 किमी दूर मलीहाबाद इथे आहे. आतापर्यंत त्यांनी इथे अनेक वेगवेगळ्या आंब्यांची लागवड केली आहे. कलीमुल्लाह हे देशात ‘मँगोमॅन’ नावाने ओळखले जातात. ते गेल्या 50 वर्षांहून अधिक आंब्यांची शेती करत आहे तसेच आंब्यांच्या नवनव्या जातींचाही त्यांनी आजपर्यंत शोध लावला आहे. मोदींच्या नावाने असलेल्या आंब्याचे झाड यंदा बहरले आहे. ते नेहमी नवे प्रयोग करतात. एखादा यशस्वी झाल्यावर त्याला नाव दिले जाते.

कलीमुल्लाह पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित
कलीमुल्लाह यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. नैसर्गिकरीत्या या जातीच्या आंब्यांचे उत्पन्न त्यांच्या बागेत आलेय. ’करेला’ आणि ’दशेरी’ यांच्या मिश्र वैशिष्ट्यांनी आंबा तयार झालाय. काही जण हाजी यांच्या आमराईत आले होते. त्यांना इथे 4-5 वेगळ्या धाटणीचे आंबे दिसले. हा आंबा पिकायला अजून महिन्याभराचा अवकाश आहे.