उत्तर प्रदेशातील जंगलात सापडली ‘मोगली’

0

लखनऊ । दूरदर्शनवर अफाट लोकप्रिय झालेली जंगल बुक ही मालिका माहीत नसलेला दर्शकच विरळा. त्यात मोगली कोल्ह्यांसोबत लहानाचा मोठा होता. त्यांच्यासारखाच वागतो. अगदी तशीच घटना आता उत्तर प्रदेशातील बहराइचच्या जंगलात घडली आहे. पोलिसांना या जंगलात एक मुलगी सापडली आहे, जी तिथल्या माकडांसोबत राहायची. तिचे वागणे ही माकडांसारखेच होते. तिला माणसांची भाषा ही समजत नाही, शिवाय तिच्या सर्व सवयी या माकडांसाररख्या आहेत.

पोलीस उपनिरीक्षक सुरेश यादव नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा कतरनी घाट अभयारण्याच्या मोतीपूर रेंजमध्ये त्यांना माकडांच्या टोळीत एक मुलगी आढळली. सुरुवातीला त्यांना वाटले की, या मुलीला या माकडांनी घेरले आहे. मात्र, तिथे ती मुलगी शांतपणे बसली होती तसेच तिला या माकडांपासून कोणताही त्रास नव्हता. त्यानंतर सुरेश यादव यांनी या मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता माकडांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात करत त्याला विरोध केला. मुलगीही माकडांच्या टोळीपासून दूर जाण्यास तयार नव्हती. अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलिसांना या मुलीची सुटका करण्यात यश मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

ही मुलगी माणसांना पाहिलं की घाबरते. तिला कोणत्याही भाषेचे ज्ञान नसून, तिला बोलताही येत नाही आणि समजतही नाही तसेच डॉक्टरांना बघितले की ती मोठमोठ्याने ओरडते. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यास अडचण होत आहे.

तिच्यावर आता उपचार सुरू आहे. उपचारामुळे तिच्यात आता सुधारणा होत आहे. जेव्हा तिला जंगलातून आणलं होते. तेव्हा ती खूप अशक्त होती. तिचे वजन अतिशय कमी होते. आता तिच्या वजनात वाढ झाली आहे. तिला दोन पायांवर चालता येत नसल्यानें सध्या तिला दोन पायांवर चालण्याचे प्रशिक्षण दिलं जात आहे तसेच सध्या ती मानसिकरीत्या पूर्णपणे ठीक नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

असा झाला बदल
आता ती माणसांना घाबरत नाही, पण माकडांप्रमाणे किंचाळते. ही मुलगी कपडे घालत असली, तरी ते घालायचे कसे हे तिला समजलेले नाही. पूर्वीसारखे ती आता जेवण फेकून देत नाही. पण हातात घेऊन खायचे अजून शिकलेली नाही. ती अजूनही प्राण्यांप्रमाणे तोडांनेच खाते. पायावर उभे राहून चालण्यास ती शिकली आहे. पण कधी कधी ती हात आणि पायाच्या आधारावर चालते.

उपचारादरम्यान अनेक अडचणी
बहराइच जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. डी.के. सिंग म्हणाले की, ही मुलगी कोणाची आहे, कुठून आली, केव्हापासून जंगलातल्या माकडांसोबत आहे याची काहीच माहिती मिळत नाही. दोन महिन्यांपूर्वी ही मुलगी सापडली. मुलीवर उपचार सुरू असून, तिची भाषा प्राण्यांप्रमाणे आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत.