उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्यास अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा सज्ज

0

सेऊल । उत्तरकोरिया आणि अमेरिकेमध्ये सातत्याने तणाव वाढत असताना अमेरिकेची थाड ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सज्ज झाली आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये थाड यंत्रणा कार्यान्वित केली असून, उत्तर कोरियाचा कुठलाही क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यास ही यंत्रणा सक्षम असल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे. अमेरिकेची थाड यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी, ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करण्यास अजून काही महिने लागतील अशी माहिती आहे.

उत्तर कोरियाकडून सातत्याने अणुचाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणीच्या धमक्या दिल्या जात आहेत. उत्तर कोरियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आपली युद्ध जहाजे आणि पाणबुड्या कोरिया जवळच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. सोमवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने संयुक्त युद्ध सराव केला.

सीऑनग्जुमध्ये अमेरिकेने थाड यंत्रणा तैनात केली असली, तरी तिथल्या स्थानिकांनी मात्र याविरोधात निदर्शने केली. अमेरिकेच्या मिसाइल सिस्टिममुळे इथेच संभाव्य हल्ला होईल. त्यामुळे आपण धोक्यात येऊ असे इथल्या स्थानिकांचे मत आहे. या सिस्टिमच्या रडार रेंजमध्ये चीन लष्कराच्याही हालचाली येत असल्याने चीननेही थाडच्या तैनातील विरोध केला आहे. उत्तर कोरियाने कोणत्याही क्षणी कोणत्याही स्थळी अणुचाचणी घेण्याचा इशारा दिल्याने कोरिया खंडात आधीच वाढलेल्या तणावात भर पडली असताना अमेरिकेने प्रत्युत्तरात लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही.