उत्तरप्रदेश मुख्यमंत्रिपदावरून सस्पेन्स!

0

लखनऊ : ऐतिहासिक विजयानंतर उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचे यावरून भारतीय जनता पक्षात अद्याप एकमत झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी त्यांनी ती शक्यता स्वतःच नाकारली आहे. त्यातच मुख्यमंत्रिपदाचे नाव गुलदस्त्यात ठेवून, 17 मार्चरोजी मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही भाजपने जाहीर केली आहे. ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाणार आहे. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. त्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत होता.

संघाला हवा दलित मुख्यमंत्री!
भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक 16 मार्चरोजी होणार असून, या बैठकीत आमदार आपला नेता निवडतील, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. पक्षात पूर्णतः लोकशाही असल्याने मुख्यमंत्रिपदाचा नेता लादला जाणार नाही, असेही सूत्राने स्पष्ट केले. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात पूर्ण बहुमत मिळाल्याने पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाचा नेता निवडण्यासाठी कामाला लागलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सर्वात पुढे आहे. तथापि, मागासवर्गीय किंवा दलित समाजातील नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यात यावे, अशी रा. स्व. संघाची इच्छा आहे. मुख्यमंत्रिपद वरिष्ठ जातीला दिले तर उपमुख्यमंत्रिपद तरी मागासवर्गीय जातीला दिले जावे, अशी सूचना संघाने भाजपला केलेली आहे. राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त डॉ. महेश वर्मा, केशवप्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, स्वतंत्रदेव सिंह, सतीश महाना आणि मनोज सिन्हा हे भाजपनेते सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.