उजेड करण्यासाठी आता अंधारालाच जाळू..!

0

हा अनुभव मला स्वतःचे आत्मपरीक्षण करायला भागदेखील पाडतोय. मी माझे हात-पाय, डोळे, शरीर व्यवस्थित असूनदेखील या सर्व भावंडांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये कमजोर आहे. उजेड करण्यासाठी अंधारालाच जाळून ही ‘माणूस’ असलेली निःस्पृह व्यक्तिमत्त्व आपल्या वाटा स्वतः तयार करताहेत. हे चित्र निराश होऊन मरणार्‍यांना, व्यसनी आणि भविष्याची कुठलीही चिंता न करणार्‍या युवकांच्या डोक्याची आणि मनाची मशागत करण्यासाठी फार उपायकारक आणि गुणकारक सिद्ध होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एकदा माणसं निवास करत असलेल्या ‘मनोबल’ सारख्या समृद्ध घराला भेट देणं आवश्यक आहे.

जळगावात रविवारी ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचा राज्यातील महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात निःस्पृह भावनेने समाजाची सेवा करणार्‍या सेवेकर्‍यांचा सन्मान अगदी भावविभोर वातावरणात पार पडला. हा सत्काराचा कार्यक्रम याची देहा याची डोळा पाहणारे लोकं किमान चार-वेळा तरी आपल्या अश्रूंना रोखू शकले नसतील हे अगदीच ठामपणे सांगतोय. कारण आलेल्या प्रत्येक ‘माणूस’ असलेल्या व्यक्तींचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी दीपस्तंभच्या मनोबल केंद्रातले विद्यार्थी समोर येत होते आणि हे दृश्य फार अफाट होतं.

अंध, अपंगांसाठी त्यांच्याप्रती कृतिशील कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने ‘दीपस्तंभ’ने विविध उपक्रम सुरू केले आहेत. “पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू…” समाजसेवक बाबा आमटे यांच्या या ओळींप्रमाणे सामाजिक कार्याचा वसा घेत दीपस्तंभचे ‘मनोबल’ केंद्र दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभचा प्रकाशाच्या नव्या वाटाच घेऊन आला आहे. प्रज्ञाचक्षू व विशेष विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास व आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने मनोबल हे दिव्यांगांसाठी हे देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र ठरले आहे. इथे समाजातील दात्यांच्या मदतीने निवास व भोजनाची उत्तम सोय दिली आहे. सोबतच त्यांना उपयोगी आणि आवश्यक सर्व सुविधा इथे अगदी विनामूल्य या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. इथंही अंध-अपंग पोरं आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहताहेत. अनेकांच्या आयुष्यात यशाची ज्योतसुद्धा या केंद्रामुळे तेवली आहे, अनेक पोरं इथून अधिकारी बनलीत. यामागे इथले ‘मास्तर’ अशी ओळख असणारे यजुर्वेंद्र महाजन आणि सहकार्‍यांची अफाट मेहनत आहे.

असो, तर या पुरस्कार सोहळ्यात एकंदरीत अंध आणि अपंग व्यक्तींच्या बाबत आपण जो सहानुभूतीने विचार करत असतो, त्या विचारांनादेखील फाटा देऊन हे शरीराने अंध-अपंग असलेले विद्यार्थी अक्षरशः प्रेरणेचे अफाट स्त्रोत बनले होते. या कार्यक्रमात मनोबलच्या अंध आणि अपंगांचा वावर अगदी सहज होता. त्या सर्वांचे मंचावर येऊ बोलणे, गाणे आणि त्यांची बॉडी-लँग्वेजही शरीराने धष्टपुष्ट असलेल्या सभागृहातील शेकडो व्यक्तींना लाजवत होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र चव्हाण यांनी करून जो रोमांच उभा केला तो अगदी केबीसीच्या अमिताभपेक्षाही अफाट होता. ते सांगतात माझी दृष्टी माझ्या निष्काळजीपणामुळे गेली. मात्र, दृष्टी नाही म्हणून मी डोळस नाही असे बिलकूल नाही. आम्हा अंधांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. कर्तव्य भावनेने आम्हाला सहकार्य मिळाले, तर आम्ही स्वतःचा विकास तर करून सोबतच समाजाचादेखील विकास करू, असे इथली पोरं आज अत्यंत आत्मविश्‍वासाने सांगत आहेत.

‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असणारे स्वागत थोरात यांनी दीपस्तंभच्या अंध विद्यार्थ्यांसाठीच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी अंधांसाठी राष्ट्रीय स्तरावर फार मोठे काम केले आहे. अंधांसाठी देशातील पहिले स्पर्शज्ञान नावाचे ब्रेल मासिक सुरू केले. रिलायन्स दृष्टी या देशातील पहिल्या ब्रेल पाक्षिकाचे ते मुख्य संपादक आहेत. अंध व्यक्तींना सोबत घेऊन तयार केलेल्या स्वातंत्र्याची यशोगाथा, बिन पैशाचा तमाशा, अपूर्व मेघदूत अशा जागतिक विक्रम करणार्‍या नाटकांची निर्मितीदेखील त्यांनी केलीय. अंधांसाठी डोळस रस्ता असं त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर अंधांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा फार चुकीचा असतो. अंध असण्याची जाणीव डोळस लोकांनी करून घेतल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात, असे ते म्हणतात.

खरोखर केवळ अंध आहे म्हणून नुसती पोकळ सहानुभूती दाखवणे चुकीचे आहे. डोळे सोडून बाकीच्या ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर करून मोठ्या पदांवर पोहोचलेली अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. प्रत्येक स्पर्श आणि आवाज हा वेगळा असतो आणि याच्या आधारे अंध व्यक्ती आपल्या अनोख्या भावविश्‍वाच्या आधारे अतिशय सक्षम असतात, हे मी स्वतः काही दिवसांपासून अनुभवतोय. साधा जेवणाचा डबा आणि पाण्याचा एक ग्लासदेखील इतरांच्या हाताने इथली मुलं घेत नाहीत. हा अनुभव मला स्वतःचे आत्मपरीक्षण करायला भागदेखील पाडतोय. मी माझे हात-पाय, डोळे, शरीर व्यवस्थित असूनदेखील या सर्व भावंडांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये कमजोर आहे आणि हे मी मान्यदेखील करतोय. उजेड करण्यासाठी अंधारालाच जाळून ही ‘माणूस’ असलेली निःस्पृह व्यक्तिमत्त्व आपल्या वाटा स्वतः तयार करताहेत. हे चित्र सर्व सुविधा असून क्षुल्लक कारणामुळे आत्महत्या करणार्‍या, केवळ नोकरी नाही म्हणून निराश होऊन मरणार्‍यांना, व्यसनी आणि भविष्याची कुठलीही चिंता न करणार्‍या युवकांच्या डोक्याची आणि मनाची मशागत करण्यासाठी फार उपायकारक आणि गुणकारक सिद्ध होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एकदा माणसं निवास करत असलेल्या ‘मनोबल’ सारख्या समृद्ध घराला भेट देणं आवश्यक आहे.

– निलेश झालटे
9822721292