उघड्यावर शौचास बसणार्‍यांना दणका

0

चाळीसगाव : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शोचास बसून इतर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍यांवर 1 जानेवारी 2017 पासून मुंबई पोलीस अधिनियम 1959 अंतर्गत कलम 115 व 117 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाकडून पोलिसांना सोबत घेवून ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती चाळीसगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ए.बी.राणे यांनी दिली आहे.

हगनदारी मुक्तीवर कोट्यवधीचा खर्च
ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी अनेक ग्रामस्थ पहाटे व रात्रीच्या सुमारास उघड्यावर शौचास बसतात. शासनाने गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी विविध योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत. त्यासाठी प्रत्येक खेड्यात मागेल त्याला शौचालय व अनुदान देखील दिले जात असतांना काही ग्रामस्थ मात्र उघड्यावरच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर शौचास बसत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने शासनाने येत्या नविन वर्षापासून 1 जानेवारी 2017 पासून अशा उघड्यावर बसणार्‍या ग्रामस्थांवर मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 115 व 117 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

गुड मॉर्निंग पथकाची नियुक्ती
1 जानेवारीपासून पासून यासाठी पंचायत समितीमार्फत गुड मॉर्निंग पथकाची नियुक्ती करुन त्या पथकात पंचायत समितीचे कर्मचारी, अधिकारी यासह पोलीस व व्हिडिओ कॅमेरा घेवून फोटोग्राफर देखील असणार आहे. अशा ग्रामस्थांना अटक करुन न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच कारवाई तर होईलच सिद्ध झाल्यास 12 हजार रुपये दंड व 6 महिन्याची कैदेची शिक्षा देखील होवू शकते. त्याचप्रमाणे कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

बीडिओंचे विभागीय आयुक्तांतर्फे कौतुक
चाळीसगाव पंचायत समितीचे प्रभारी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी ए.बी.राणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील घरकूल कामांचे नियोजन, शौचालयाबाबतचे उद्दिष्ठ पूर्ण केले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल 7 डिसेंबर रोजी जळगाव येथे जिल्हा परिषद येथे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची मिटींग झाली. या मिटींगमध्ये एकनाथ डवले यांनी ए.बी.डवले यांनी विशेष कौतुक केले तर पूर्णवेळ गटविकास अधिकार्‍यांना त्यांनी खडबोल सुनावले.

पंचायत समितीत सत्कार
विभागीय आयुक्तांनी कौतुक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर.8 डिसेंबर रोजी त्यांचा पंचायत समितीमध्ये ए.बी.राणे यांच्या संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र निकम यांनी सत्कार केला. त्यावेळी ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष संजीव निकम, प.स.चे.राजेंद्र महिरे, मनोहर गांगुळे, किरणमाला जंगम, श्री.दीपक, अमित चव्हाण, पत्रकार मोतीलाल अहिरे, सरपंच राजेंद्र राजपूत उपस्थित होते.