उघड्यावर शौचाला जाणारे कचाट्यात

0

अमळनेर । शासनातर्फे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत संपुर्ण राज्य 2018 पर्यत हगणदारी मुक्त करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. हगणदारीमुक्तीसाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. वैयक्तिक अनुदान देखील देत आहे. परंतु अजुनही जळगाव जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त झाला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 जानेवारी पासून उघड्यावर शौच करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे फरमान शासनाने सोडले आहे. अमळनेर नगरपरिषदेने गेल्या दोन दिवसांपासून उघड्यावर शौचविधी करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम सुरु केली आहे. 60 ते 70 कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासनातर्फे ही मोहिम राबविण्यात येत आहे. आतापर्यत 10 ते 15 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र नगरपरिषदेची ही कारवाई म्हणजे जखमेवर योग्य उपाय न करता खर्चच अधिक असल्याचे दिसत आहे. शहरात पुरुषांसाठी असलेली सार्वजनिक शौचालयाची संख्या कमी आहे. जे आहेत त्यात पाणी, लाईटची व्यवस्था नाही. शौचालयात पुरेशी सुविधा उपलब्ध करुन न देता कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

1382 शौचालय बांधकाम पूर्ण
शहरात नगरपरिषद प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून शौचालय बांधण्याबाबत जनजागृती सुरु ठेवली आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावीयासाठी शहरात फलक लावणे जिल्हाधिकारी व आमदार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करणे, स्वछतादूताची नेमणूक करुन शाळा महाविद्यालयात मार्गदर्शन करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे. वैयक्ति शौचालयाच्या अनुदानासाठी नागरिकांना अर्ज वाटप करण्यात आले. 2 हजार 648 नागरिकांनी अर्ज भरून दिले होते. त्यापैकी 2 हजार 448 लाभार्थ्याना 6 हजार रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले. 1 हजार 382 लाभार्थ्यानी शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे. 1 हजार 759 लाभार्थ्याना अनुदानाचा तिसरा हप्ता देण्यात आला आहे.

शासकीय लाभाच्या यादीतून नावे कमी होणार
689 लाभार्थ्यानी अनुदानाचा पहिला हप्ता घेऊनही अजूनही शौचालय बांधकामास सुरवात केलेली नाही. नगरपालिकेने मोठया प्रमाणात अनुदान देऊन ही नागरिकांनी कर्मचा़र्‍यांना मारहाण करणे, पोलिसांच्या वाहनाची अडवणुक करणे, फोन वर धमक्या देणे असे कृत्य सुरु आहे. तरी देखील प्रशासनाने मोहीम सुरू ठेवली आहे. तांबेपुरा, पैलाड, गांधलीपुरा, फारशी रोड किल्ला चोक , भुई वाडा, रुबजी नगर, बाहदरपूर रोड, मिळचाळ बाजारपेठ, बंगाली फाईल आदी भागात शौचालयाचे बांधकाम अपुर्ण आहे. शौचालयाचा वापर न करणार्‍यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड तसेच शासकीय लाभ रद्द करण्यात येणार आहे.

जागेच्या अभावामुळे बांधकाम अपुर्ण
पैलाड भागात खासदार निधीतून 20 सीट शौचालय बांधून तयार आहे. परंतु पाणी व दिवे तसेच किरकोळ दुरुस्तीमुळे या शौचालयाचा वापर होत नाही. शासनातर्फे अनुदान वाटप करण्यात आले असले तरी शहरातील मागास भागात राहणार्‍या नागरिकांजवळ शौचालय बांधण्यासाठी पुरेश जागा नसल्याने ते बांधकाम करु शकत नसल्याची अडचण आहे. यासाठी नगर पालिका प्राशसनाने पुढाकार घेऊन सहकार्य केले पाहिजे अशी मागणी देखील नागरीकांमधुन हेत आहे.

दोन कोटीचीं बक्षिसे मिळणार
शौचालय बांधकामासाठी शासनाकडून 12 हजार व नगरपालिका प्रशासनतर्फे 5 हजार असे 17 हजार रुपये अनुदान देत आहे. जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी उपाययोजना सुरु आहे. हगणदारीमुक्त होणार्‍या तालुक्याला तसेच गावांना बक्षीस देखील देण्यात येत आहे. अमळनेर शहर शंभर टक्के हगणदारीमुक्त झाल्यास प्रोत्साहनपर 2 कोटी 40 लाखाचे बक्षीस शासनातर्फे मिळणार आहे. तर ही योजना जर पूर्णपणे राबविली गेली नाही तर कर्मचार्‍यांच्या वेतनावर मिळणारे सहाय्य अनुदान बंद होणार आहे.

तसेच विविध विकास कामांना मिळणारे अनुदाना व्यतिरिक्त इतर अनुदान मिळणार नसल्याचे जाहिर करण्यात आले आहे. शौचालय बांधण्याचे आवाहन मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांनी केले आहे.