उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी मुठा कालवा पोखरल्यानेच तो फुटला – गिरीश महाजन

0

पुणे : खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला पडलेल्या भगदाडाचं खापर उंदीर, घुशी आणि खेकड्यांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोडलं आहे. उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी हा कालवा पोखरल्यानेच तो फुटल्याचं तर्कट गिरीश  महाजन यांनी मांडलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गुरुवारी मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल आणि परिसरात पाणी साचल्याने खळबळ उडाली होती. परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे महाजन यांनी आज या कालव्याची पाहणी केली, त्यासोबत स्थानिकांची विचारपूसही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन यांनी अजब तर्कट मांडले. ‘कालव्याच्या परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढे खेकडे आहेत. या खेकडे, उंदीर आणि घुशींनी हा कालवा पोखरला. गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे कालव्याला भगदाड पडले’, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्यानंतर ही माहिती आपल्याला अभियंत्यांनीच दिल्याची पृष्टीही त्यांनी जोडली. महाजन यांनी केलेल्या अजब वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गुरुवारी आलेल्या पुरामुळे एकूण १५६७ झोपड्या बाधित झाल्या असून यात दांडेकर पूल, कासम प्लॉटवरील झोपड्यांचा समावेश आहे. अचानक निर्माण झालेल्या या पूरपरिस्थितीमुळे सुमारे २३१ नागरिकांना शाळा, बुद्ध विहार, साने गुरुजी स्मारकात आश्रय घ्यावा लागला आहे.

Copy