उंचपुऱ्या स्टार्कचा सामना करण्यासाठी अनिकेतचा करणार वापर

0

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने महिनाभर आधीच योजना आखण्यास सुरूवात केलेली आहे. भारतीय संघाने देखील ऑस्ट्रेलियाचे आव्हान फोडून काढण्यासाठीची आखणी सुरू केली आहे. मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा हुकुमाचा एक्का समाजला जातो. या डावखुऱ्या गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी भारतीय संघाचे फलंदाज नेटमध्ये त्यादृष्टीने ठराविक सराव करत आहेत. स्टार्कच्याच उंचीच्या डावखुऱ्या अनिकेत चौधरी या गोलंदाजाची मदत घेऊन भारतीय फलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत.

स्टार्कची गोलंदाजी खेळणे कठीण

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजी टप्प्याचा नेमका अभ्यास करून त्यावर फटके खेळण्यासाठी अनिकेत चौधरीची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना मदत देणारी ठरेल. उजव्या हाताच्या फलंदाजांना स्टार्कची गोलंदाजी खेळणे कठीण जात असल्याचे आपण पाहिले आहे. भारतीय संघात उजव्या हाताने खेळणारेच सर्वाधिक फलंदाज आहेत. त्यामुळे अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर जास्तीत जास्त नेटमध्ये घाम गाळून स्टार्कच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता येईल, या उद्देशाने सराव केला जात आहे.

इनस्विंग यॉर्करची ताकद अफाट

स्टार्कच्या इनस्विंग यॉर्करची ताकद अफाट आहे. स्टार्कचे हे अस्त्र फोडून काढण्यासाठी भारतीय संघाने पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाकडून अनिकेत चौधरीला खेळविण्यात आले होते. या सामन्यात चौधरीने चार विकेट्स देखील घेतल्या होत्या. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी देखील भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीचा सराव केला होता. किवींचा डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या आव्हानाला सहज सामोरे जाण्यासाठी भारतीय फलंदाजांनी तसा सराव केला होता