ई-कंपन्यांना पावला प्रेमाचा उत्सव; घेतली कोटींची उड्डाणे

0

मुंबई । चॉकलेट्स, गिफ्टस, सिनेमा, टेडी बियर, पर्स, फॅशन, अ‍ॅर्नामेंटस, ज्वेलरी, कपडे, घड्याळे आणखी खूप काही खरेदी करण्याकरिता गत आठ दिवसांपासून ऑनलाइन तसेच मुंबईसह देशभरातल्या दुकानांत झुंबड उडाली आहे. यात जरी तरुणाईचा भरणा अधिक असला तरी सर्वच वयोगटातल्या प्रेमीजनांनी आपला सहभाग नोंदवला आहे. जगभरात आज मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. खरे तर तो सात फेब्रुवारी पासूनच विविध डेच्या माध्यमातून साजरा होतो आहे. व्हॅलेंटाइन डेचे सेलिब्रेशन ही जागतिक बाजारपेठेची फार मोठी आवश्यकता बनत चालली आहे, त्याच्याच स्पर्धेमुळे तर सध्या ग्रिटींग्ज कार्डपासून ते ऑनलाइन महागड्या शॉपिंगपर्यंतच्या सर्व कंपन्यांनी जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचण्याकरिता अक्षरश: रस्सीखेच सुरू केल्याचे पहावयाला मिळाले.

फ्लिपकार्टने कपडे, घड्याळे, ज्वेलरी, वूमन्स फॅशन आयटम्सवर 70 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली. तर अ‍ॅमेजॉनने प्राईम टाईम सर्व्हिस स्कीम चालवली. यात महिला आणि तरुण ग्राहक हेच खरे टारगेटेड होते. सॅमसंगनेही स्मार्ट फोन आणि स्मार्ट वॉचला भरघोस सूट दिली. स्नॅपडीलनेही 60 ते 70 टक्क्यांची विशेष ऑफर आठ दिवसांकरिता जाहीर केली होती.

अ‍ॅपलची भरारी अन कॅश बॅक

अ‍ॅपलने या सर्वांवर मात करीत 5 हजार रुपयांची कॅश बॅक ऑफर आणली. याचा फायदा घेणार्‍यांना 14 पर्यंत खरेदीची मुभा तिही एचडीएफसी बँकेच्या डेबिड कार्डवर करण्याची अट होती. याशिवाय इतर बँकाच्या कार्डवर खरेदी केल्यानंतर 2 हजाराची सवलत देण्यात आली होती. व्हँलेंटाइनच्या आठ दिवसाच्या सोहळ्यात कोट्यवधींची उलाढाल करण्यात ई कंपन्यांनी बाजी मारली असून, दिवाळीप्रमाणेच खरेदीकरिता ग्राहकांनी ऑनलाइन काऊंटरला गर्दी केल्याचे चित्र होते.

गुलाबाची विक्री 8 कोटींपेक्षाही पुढे

दिल वाले दिल्लीकरांनी यंदाच्या व्हँलेटाइनची कोट्यवधीची उड्डाणे घेतली आहेत. दिल्लीच्या फुलबाजारात गत दोन दिवसांत गुलाबांच्या फुलांची उलाढाल 7 ते आठ कोटींपेक्षाही पुढे गेली आहे. दिल्लीतल्या गाजीपूर बाजारात रोज 20 रुपयाला विकला जाणारा गुलाब दोन दिवसांत 200 ते 2100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, हॉटेल्स, कॉलेज, कँटीन, रेल्वे स्थानके आदी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गुलाबाची विक्री झाली आहे.