इस्त्रोचे विश्‍वविक्रमी उड्डाण; एकाच वेळी 104 उपग्रहांचे प्रक्षेपण

0

श्रीहरीकोटा । भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्त्रो’ने आज श्रीहरीकोटा येथून एकाच वेळी तब्बल 104 उपग्रहांना अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्याची देदीप्यमान कामगिरी करत नवीन विश्‍वविक्रमाची नोंद केली आहे. भारताने 2015मध्ये एकचदा 20 उपग्रह प्रक्षेपित केले होते. तर याआधी रशियाने 2014 साली एकचदा 37 उपग्रह प्रक्षेपित करत विश्‍वविक्रम नोंदविला होता. इस्त्रोच्या आजच्या कामगिरीमुळे हे दोन्ही विक्रम मोडीत निघाले आहेत. भारतीय बनावटीच्या ‘पीएसएलव्ही सी 36’ या प्रक्षेपकांच्या मदतीने इस्त्रोने ही कामगिरी करून दाखवली आहे. यातून अंतराळ संशोधनातील भारताचे नाव आता आघाडीच्या देशांसोबत घेतले जाणार आहे. या अभूतपुर्व कामगिरीनंतर इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान व राष्ट्रपतींसह विविध मान्यवरांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज प्रक्षेपित करण्यात आलेल्या 104 उपग्रहांमध्ये 101 उपग्रह हे विदेशी होते हे विशेष. तर भारताचा कार्टोसॅट-2 हा अत्यंत महत्वपूर्ण उपग्रहदेखील अंतराळाततील कक्षेत यशस्वीपणे स्थिर झाला आहे. या कामगिरीमुळे इस्त्रोला आता जगभरातून खासगी उपग्रहांच्या प्रक्षेपक्षाचे काम मिळू शकते. या व्यावसायिक लाभासोबत आता जगातील मातब्बर देशही इस्त्रोच्या या कामगिरीमुळे थक्क झाले आहेत.

काय आहे ‘पीएसएलव्ही’

पीएसएलव्ही म्हणजेच ध्रुविय उपग्रह प्रक्षेपक वाहन (पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल) होय. हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे प्रक्षेपक असून 20 सप्टेंबर 1993 साली पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला होता. याचे पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले तरी नंतर मात्र या प्रक्षेपकाने यशाची नवनवीन शिखरे सर केली. तेव्हापासून आजवर या प्रक्षेपकाच्या मदतीने 122 उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले आहेत. आजवर या प्रक्षेपकाच्या मदतीने एकचदा अनेक उपग्रह प्रक्षेपित करता येतील की नाही? याबाबत संभ्रम होता. आता मात्र याच्याच मदतीने विश्‍वविक्रमी कामगिरी करण्यात आली आहे.

कार्टोसॅट-2 उपग्रह

भारताने या मोहिमेत एकूण तीन उपग्रह प्रक्षेपित केले असून यात कार्टोसॅट-2 या मालिकेतील पाचव्या उपग्रहाचा समावेश आहे. 714 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीपासून 520 किलोमीटर अंतरावर अंतराळात प्रदक्षिणा घालणार आहे. यात अतिशय शक्तीशाली कॅमेरे असून याच्या मदतीने पृथ्वीवरील कोणत्याही भागाची उच्च दर्जाची प्रतिमा करण्यास तो सक्षम आहे. अर्थात याचा सामरिकदृष्टीने खूप उपयोग होणार आहे. विशेष करून सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. याशिवाय दूर संवेदनासाठी तो उपयुक्त ठरेल. नैसर्गिक आपत्तींसह विविध कामांमध्ये याचा उपयोग होणार आहे. तर यासोबत आयएनएस-1ए आणि आयएसएस-1बी हे नॅनो उपग्रहदेखील प्रक्षेपित करण्यात आले आहेत. ते इस्त्रोच्या अन्य उपग्रहांना पूरक ठरणार्‍या सेवांसाठी अंतराळात पाठविण्यात आले आहेत.

खासगी अंतराळ मोहिमांमध्ये संधी

इस्त्रोच्या आजच्या मोहिमेत अमेरिकेतील खासगी कंपन्यांसह इस्त्राएल, कजागिस्तान, नेदरलँड, स्विर्त्झलँड आणि युएई या देशांचे 101 उपग्रहदेखील अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. हे सर्व उपग्रह हे ‘नॅनो सॅटेलाईट’ या प्रकारातील आहेत. हे सर्व उपग्रह इस्त्रोची शाखा असणार्‍या ‘अंतरिक्ष कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून व्यावसायिक पातळीवर अवकाशात पाठविण्यात आले. जगातील बहुतांश देशांकडे स्वत:ची उपग्रह प्रक्षेपक प्रणाली नाही. यामुळे ‘नासा’सह रशिया आणि चीनी अंतराळ संशोधन संस्था व्यावसायिक पातळीवर या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करतात. याशिवाय जगातील अनेक कंपन्याही स्वत:चे उपग्रह याच पध्दतीने पाठवत असतात. इस्त्रोसाठी हा परकीय चलन मिळवण्याचा मार्ग आहे. आजच्या मोहिमेमुळे इस्त्रोची जागतिक पातळीवर विश्‍वासार्हता वाढणार असून खासगी अंतराळ मोहिमांच्या बाजारपेठेत उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ‘नासा’च्या तुलनेत ‘इस्त्रो’ तब्बल 60 ते 65 टक्के कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपित करत असल्याने या संस्थेकडे जगभरातील ग्राहकांचा कल वळू शकेल असे मानले जात आहे.

भारताचा दबदबा

इस्त्रोने आधीच चांद्रयान आणि मंगलयान आदींसारख्या मोहिमांच्या माध्यमातून जगभरात आपल्या गुणवत्तेचा मापदंड प्रस्थापित केला आहे. आजच्या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताचे नाव अमेरिका, रशिया आणि चीन या आघाडीच्या देशांसोबत घेतले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ‘नासा’सह रशिया आणि चीन सरकारच्या मोहिमा अत्यंत खर्चिक असतांना ‘इस्त्रो’ने अत्यंत आटोपशीर खर्चात आपल्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. यातच एकचदा 104 उपग्रहांना प्रक्षेपित करण्याचा विश्‍वविक्रम केल्यामुळे ‘इस्त्रो’च्या आणि पर्यायाने भारताच्या अंतराळ संशोधनातील लौकिकात वाढ होणार आहे.

कौतुकाचा वर्षाव

बुधवाराच्या अभूतपूर्व कामगिरीनंतर इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पीएसएलव्ही सी-37 आणि कार्टोसॅट उप्रगहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतूक केले. इस्रोची ही उल्लेखनीय कामगिरी देशासाठी आणि भारताच्या अंतराळ शास्रत्रांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मोदींनी ट्विट करून सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. देशाला इस्त्रोच्या कामगिरीचा गर्व आहे. भारत अंतराळ क्षेत्रात आपली क्षमता वाढवत असल्याचे सांगत मुखर्जी यांनी ‘इस्त्रो’चे कौतुक केले. याशिवाय देशभरातील मातब्बर नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रांमधील सेलिब्रिटी मंडळीनेही या यशाबद्दल भरभरून कौतुक केले. ‘सोशल मीडिया’तही आज याचीच चर्चा राहिली.

लाभदायक मोहिम

‘इस्त्रो’चे चेअरमन ए.एस. किरणकुमार यांनी ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यात त्यांनी या मोहिमेला किती खर्च लागला याची माहिती दिली नाही. मात्र त्यांनी यातील अर्धा खर्च हा विदेशी उपग्रहांना प्रक्षेपित करून मिळाला असल्याचे सांगितले. ही रक्कम सुमारे 100 कोटी रूपयांइतके असल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थात यातून मोहिमेचा बराच खर्च भरून निघाला असून ही मोहिम इ स्त्रोला लाभदायक ठरली आहे.