इमानचे वजन 300 किलो घटले

0

मुंबई। इजिप्तमधील इमान अहमदचे वजन दोन महिन्यांत 500वरून 171 किलोवर आणण्यात सैफी रुग्णालयाला यश मिळाले असून इमानच्या बहिणीने डॉक्टरांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. डॉक्टरांनी इमानचे वजन कमी व्हावे यासाठी पूर्ण प्रयत्न केले असून यापुढे तिच्यावर अबू धाबीला उपचार करण्यात येतील, असे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. इमानची बहीण शायना सेलीम हिने केलेल्या आरोपांचे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी खंडन केले असून भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी.ही या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. सेलीमच्या आरोपामुळे वैद्यकीय पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, अशी भावना शायना एन. सी. यांनी व्यक्त केली. शायना यांनी या वादात उडी घेतल्यामुळे एकप्रकारे रुग्णालयाने राजकीय संरक्षण घेतले असल्याचे दिसते. विदेशी रुग्णाचे कुटूंबिय या रुग्णालयाविरोधात दाद मागण्यास सरकारकडे गेले तरी फारसा फायदा होणार नाही, अशी चर्चा आहे.

बदनामीचा ठपका : इमानच्या बहिणीने उपचार अपेक्षितपणे होत नसल्याचा आरोप केल्यावर दुसर्‍याच दिवशी या रुग्णालयाने उपचारांचा वाढता खर्च टाळण्यासाठी आमच्या विनाकारण बदनामी केली जात असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतरही इमानची बहिण आपल्या म्हणण्यावर ठाम होती. त्यामुळे इमानासारख्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा येथे पुरेशा नसल्याचा मुद्दा पुढे आला होता.

आश्‍वासन पूर्ण केले
या वेळी ग्णालयातील बेरियाट्रिक विभागप्रमुख डॉ. मुझ्झफर लकडावालाही उपस्थित होते. इमानवर उपचार करण्यापूर्वी ती बसू शकेल हे शायमाला दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. इमान लगेचच चालू शकेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. इमान सैफी रुग्णालयात उपचार घेऊ शकते, तिला डिस्चार्ज दिलेला नाही. मात्र, शायना इमानला तिचे कुटूंबिय अन्य रुग्णालयात हलविणार असतील तर याबाबत रुग्णालय प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.

परिचारिका भावूक
इमानची सेवा करणार्‍या परिचारिका ती जाणार या भावनेतून भावुक झाल्या आहेत. परिचारिका शेली कोशी दोन महिन्यांपासून इमानची सेवा करीत आहेत. इमानची भाषा वेगळी असली तरी संवाद साधताना कधीच अडचण आली नाही, असे कोशी यांनी सांगितले. खाणाखुणांवरुनच या दोघींचा संवाद चालत होता. अल्पावधीतच इमानचा चेहरा वाचण्याचे कौशल्य कोशीला अवगत झाले.