इंदापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार?

0

कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर : तालुक्यातील राजकीय वातावरण तापले

इंदापूर : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील आजी व माजी आमदारांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधला असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही व आपल्याला निवडणुकीची संधी मिळणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चढाओढीत आपली पिछेहाट होण्याच्या भितीने सध्या अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत.

पाटील व भरणे यांच्यात शितयुद्ध

2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्ये केंद्रात व राज्यात युती होणार असली तरी या युतीचा फारसा परीणाम इंदापूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीवर होईल, अशी चिन्हे सध्यातरी दिसत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. मागील सहा महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. आरोप प्रत्यारोप व हेवेदाव्याचे रंगत असलेल्या कलगीतुर्‍यांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजप घेणार आघाडी

राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि काँग्रेसचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या तालुक्यातील दोन वजनदार नेत्यांमध्ये सध्या मोठी चुरस लागली आहे. अनेक नेते, पक्षाचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते सध्या आमच्या संपर्कात असून विधानसभेला तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागलेले आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजप इंदापूर तालुक्यातील एक नंबरचा पक्ष म्हणून आघाडी घेणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होणार असून भाजपाच आमदार निवडून येणारअसल्याचे भाकीत भाजप नेते पांडूरंग शिंदे यांनी व्यक्त केले आहे. इंदापूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपची मोर्चेबांधणी

2019 च्या विधानसभेचा उमेदवार व पुढील आमदार मीच असणार अशी छातीठोकपणे वक्तव्य करणारे आजी माजी आमदार यांना तालुक्यातील इतर राजकीय पक्षांचा विसर पडला असून प्रत्येक कार्यक्रमात विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणार्‍या नेत्यांना आगामी विधानसभेत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. त्यादृष्टीने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालुक्यातील अनेक मातब्बर नेते, इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या संपर्कात असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे भाकीत पांडूरंग शिंदे यांनी वर्तवले आहे.

माळी समाज बंडाच्या पवित्र्यात

मागील आठवडाभरापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील माळी समाजाला डावलून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद दुसर्‍याला दिल्यामुळे माळी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. नाराज गटातील इच्छुकांपैकी अनेकांशी सपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली आहे. सदर नाराज गट सुद्धा भाजपला मदत करण्यासाठी बंडाच्या पवित्र्यात असून पुढील आठवड्यात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.तालुक्यातील सर्व माळी समाज भाजपला साथ देणार असल्याने आगामी विधानसभा निवणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे भावी आमदार भाजपचाच होणार असल्याचे सूचक विधान शिंदे यांनी केले आहे.

बंडखोरीमुळे प्रस्थापितांना धक्का

तालुक्यातील अनेक छोटे मोठे समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू असून जवळजवळ सर्वच समविचारी पक्षांना व सामाजिक संघटनांना घेऊन भाजप निवडणूक लढविणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात तालुक्यात मोठे राजकीय वादळ येणार आहे. विधानसभेसाठी आपलीच वर्णी लागावी म्हणून अनेकांची पळापळ सुरू आहे. तर बंडखोरीमुळे प्रस्थापितांना याचा मोठा फटका बसणार असून बंडखोरी रोखण्यासाठी प्रस्थापितांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Copy